महिषासुराच्या मर्दनाचा तुळजापुरी उत्सव, देशभरातून भाविकांची दर्शनासाठी रीघ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 09:11 PM2017-09-19T21:11:55+5:302017-09-19T21:13:50+5:30
९ दिवस त्याच्याशी युद्ध करुन दहाव्या दिवशी शरण येण्यास भाग पाडणा-या देवीचा हा उत्सव नवरात्री अन् विजयादशमीच्या नावाने साजरा केला जातो़ या उत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते़
गोविंद खुरुद
तुळजापूर, दि. 19 : भगवान शंकराचा वरदान लाभलेल्या महिषासुराने त्रिलोकात उच्छाद मांडून देव, ऋषी व मणुष्यप्राण्यास सळो की पळो करुन सोडले होते़. ९ दिवस त्याच्याशी युद्ध करुन दहाव्या दिवशी शरण येण्यास भाग पाडणा-या देवीचा हा उत्सव नवरात्री अन् विजयादशमीच्या नावाने साजरा केला जातो़ या उत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते़
देशभरात नवरात्र महोत्सव २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असला तरी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव १३ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत होत आहे़ नवरात्रापूर्वी तुळजाभवानी माता ८ दिवस मंचकी निद्रा घेते़ या घोर निद्रेनंतर मुख्य नवरात्रास सुरुवात होते़ पहिल्या दिवशी सिंहासनावर प्रतिष्ठापना करुन पंचामृत अभिषेकाद्वारे नवरात्रास प्रारंभ केला जातो़ धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिंहगाभाºयात मंदिर संस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते घटस्थापना केली जाते़ यानंतर दररोज नित्योपचार, पंचामृत अभिषेक, चरण तीर्थ, नैवेद्य, धुप आरती, अंगारा व अलंकार पूजा होते़ सायंकाळच्या अभिषेकानंतर प्रक्षाळ व छबिना हे विधी पार पडतात़ नऊ दिवस चालणारा छबिना सिंह, वाघ, मोर, गरुड व हत्ती या देवीच्या वाहनांच्या प्रतिकृतींवरुन काढला जातो़ यावेळी संबळ या पारंपारिक वाद्याच्या तालावर कवड्या धारण करीत व हाती पोत प्रज्वलित केलेले आराधी, सेवेकरी व पुजारी देवीचा जयघोष करीत मंदिराला प्रदक्षिणा घालतात़ दहाव्या दिवशी नित्योपचार पूजेनंतर अजाबळीस सवाद्य मंदिरात आणले जाते़ त्याची यथोचित पूजा झाल्यानंतर होमावर बळी दिला जातो़ अजाबळीनंतर देवीसमोरीज घटांची उत्थोपना केली जाते़ मानाच्या आरत्या व पारंपारिक नैवेद्य दाखवून यावेळी नवरात्राची सांगता केली जाते़ या कालावधीत व विजयादशमी दिवशी देशाच्या कानाकोपºयातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते़ विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक या कालावधीत अनवाणी चालत येऊन देवीचे दर्शन घेतात़
देवीची घोर व श्रम निद्रा़़़
अन्यत्र नऊ दिवसांचा उत्सव साजरा केला जात असला तरी तुळजापुरात अतिरिक्त १३ दिवस हा उत्सव साजरा होतो़ नवरात्रापूर्वी देवी आठ दिवस मंचकी निद्रा घेते़ त्यास घोर निद्रा म्हणून संबोधले जाते़ तर नवरात्रानंतर पाच दिवस देवी पुन्हा निद्रा घेते़ या निद्रेला श्रम निद्रा म्हणतात़ याचाही उत्सव साजरा होत असल्याने या महोत्सवाचा कालावधी मोठा आहे़
अशी सांगितली जाते अख्यायिका़़़
महिषासुराने त्रिलोकात उच्छाद मांडला होता़ त्याने इंद्रदेवाचाही पराभव करुन राजासन बळकाविले असते़ तेव्हा ब्रम्हा, विष्णु, महेश हे देवीला जागे करुन तिला महिषासुरापासून वाचविण्याची याचना करतात व आपली सर्व शक्ती देवीला प्रदान करतात़ यानंतर देवीचे महिषासुराशी नऊ दिवस युद्ध चालते़ या काळात अनेकवेळा महिषासुर मारला जातो; परंतु रक्तबीजापासून पुन्हा-पुन्हा त्याची उत्पत्ती होते़ यामुळे सर्व देव-देवता त्यांची शक्ती देवीला प्रदान करतात़ त्यानंतर तिचे रौद्र रुप पाहून दहाव्या दिवशी महिषासूर देवीला शरण जातो़ त्यांच्यात झालेला नऊ दिवसांचा युद्धकाळ नवरात्र तर शरण आलेला दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, अशी अख्यायिका तुळजाभवानी महात्म्यमध्ये सांगितलेली असल्याचे ज्येष्ठ पुजारी युवराज साठे म्हणाले़