शहर तुंबले!
By admin | Published: August 3, 2016 12:38 AM2016-08-03T00:38:23+5:302016-08-03T00:38:23+5:30
शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने महापालिकेच्या पावसाळी कामांची गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली.
पुणे : शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने महापालिकेच्या पावसाळी कामांची गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. मागील महिन्यात झालेल्या पावसाने शहरातील नाले तसेच डे्रनेजसफाईच्या कामांची पोलखोल झाली होती. त्यानंतर पुन्हा महापालिकेने युद्धपातळीवर नालेसफाई केली. मात्र, अवघे दोन तास झालेल्या पावसाने पालिकेच्या या दुसऱ्यांदा केलेल्या नालेसफाईचीही लक्तरे निघाली असल्याचे चित्र शहरात दिसून आले. शहरभर असलेल्या सिमेंट रस्त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता उतार मिळेल तिकडे धावत सुटल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाण्याची अक्षरश: तळी साचली होती. तर ज्या पावसाळी गटारांमधून हे पाणी वाहून जाणे अपेक्षित होते, त्या गटारांमध्येच गाळ असल्याने अनेक ठिकाणी पावसाळी गटारांमधून पाणी उफळून रस्त्यावर येत असल्याचे चित्र फर्ग्युसन रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता तसेच कर्वे रस्त्यावर दिसून आले.
>रस्त्यांना नद्याचे स्वरूप : मुख्य रस्त्यांवर पाण्याचे लोट
महापालिकेने गेल्या काही वर्षांत शहरभर सिमेंटचे रस्ते केले आहेत. प्रामुख्याने मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्याला जोडणारे हे रस्ते आहेत. हे रस्ते तयार करताना त्यासाठी असलेल्या पावसाळी पाणी वाहून नेण्याच्या भुयारी गटारांची रचना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केल्याने या रस्त्यांवर पडलेला एकही पावसाचा थेंब गटारांमध्ये जात नाही. तसेच रस्त्याच्या कडेलाही महापालिकेने काँक्रिटीकरण केले असल्याने एक थेंब पाणी भूगर्भात जिरत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून मुख्य रस्त्यांवर पाण्याचे लोट येताना दिसत होते. परिणामी अनेक ठिकाणी सखल भागात एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यातून रस्ता काढताना वाहनचालकांचीच चांगलीच कसरत होत असल्याचे चित्र शहरभर दिसत होते.
>पालिकेची यंत्रणा गायब
शहरात गेल्या काही वर्षांत मोठा पाऊस झाल्यास पाणी तुंबत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत असल्याने महापालिकेने अशा ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या धर्तीवर वेगळी यंत्रणा उभारली असल्याच्या घोषणा केल्या आहेत.
मात्र, सायंकाळी साडेपाच वाजता महापालिकेची कार्यालये बंद झाल्यानंतर शहरात कोठेही ही यंत्रणा दिसून येत नाही. या पाण्याचा त्रास वाहतुकीस होत असल्याने शहरातील नागरिकच हातात मिळेल ती साधनसामग्री घेऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी पुढाकार घेतात. मात्र, अग्निशमन दल वगळता पालिकेची कोणतीही यंत्रणा शहरात रस्त्यावर दिसून येत नाही.
>पावसाळी कामांचे तीन तेरा
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील नाले तसेच डे्रनेजची सफाई झाल्यानंतरही शहरात पाणी तुंबते. आपली चूक दडपण्यासाठी महापालिकेकडून पहिल्या पावसात डे्रनेज, पावसाळी गटारे स्वच्छ होतात, असा दावा केला जातो. या वर्षीही जुलै महिन्यात झालेल्या पावसावेळी पालिकेकडून हाच दावा करण्यात आला. त्यानंतर अर्धवट राहिलेली नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. मात्र, त्यानंतर आता पुन्हा शनिवारी झालेल्या पावसाने शहरातील अनेक चौकांमध्ये गुडघाभर पाण्याची तळी साचलेली होती. या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या जाळ्यांमध्येही कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून आले. त्यामुळे पाणी तुंबून अनेक रस्ते जलमय झाले होते.
>पुणेकरांना दुहेरी मनस्ताप
पावसाने तुंबलेल्या रस्त्यांमुळे पुणेकरांना मंगळवारी दुहेरी मनस्ताप सहन करावा लागला. आधीच तुंबलेल्या रस्त्यांवरून वाट काढणे जिकिरीचे बनले असताना, अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीचाही सामना पुणेकरांना करावा लागला. सायंकाळी पाचनंतर सुरू झालेला पाऊस पुढे रात्री आठपर्यंत कोसळत होता. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी सिग्नल बंद पडल्याने रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर पावसाने अनेक रस्त्यांवर पीएमपी बस तसेच अनेक नागरिकांची खासगी वाहनेही भर रस्त्यातच बंद पडल्याने या कोंडीतून मार्ग काढताना पुणेकरांची चांगलीच दमछाक उडाल्याचे पाहायला मिळाले.