महाड एमआयडीसीत सांडपाण्याने तुंबले नाले

By Admin | Published: September 19, 2016 02:57 AM2016-09-19T02:57:41+5:302016-09-19T02:57:41+5:30

मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यात दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे दिसून येत आहेत.

Tumbles drained by the sewage to Mahad MIDC | महाड एमआयडीसीत सांडपाण्याने तुंबले नाले

महाड एमआयडीसीत सांडपाण्याने तुंबले नाले

googlenewsNext


महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्यातून सोडण्यात आलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे आसनपोई गावच्या हद्दीत नदीपात्रात हजारो मासे मृत पावल्याची मागील आठवड्यातील घटना ताजी असतानाच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यात दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे दिसून येत आहेत. हे रसायनमिश्रित सांडपाणी गटार व नाल्याद्वारे शेवटी नदीच्या प्रवाहात मिसळत असल्याने नदीचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे. कारखान्याबाहेर सोडण्यात येणारे हे सांडपाणी नाल्यात तसेच मोकळ्या जागेत साचून राहिल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन देखील नेहमीप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून काम करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मात्र कारखान्याचे हे उद्योग दिसेनासे झाले आहेत असा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर जागोजागी तुंबलेल्या नाल्याची साफसफाई करण्याचे काम देखील एमआयडीसीकडून केले जात नसल्याचे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एमआयडीसीकडून दरवर्षी नालेसफाई केवळ कागदोपत्रीच केली जात असल्याचे आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून व कारखानदारांकडून केले जात आहेत. महाड औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांच्या बाहेरील नाल्यांमध्ये प्रदूषित सांडपाणी सर्वत्र साचल्याचे दिसून येत असतानाही प्रदूषण मंडळाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वसाधारणपणे औद्योगिक क्षेत्रातील सर्व रासायनिक कारखान्यातील सांडपाणी हे प्रक्रिया करूनच वाहिनीद्वारे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात येते. त्या ठिकाणी सुमारे तीस किमी अंतरावर वाहिनीद्वारे खाडीत सोडण्यात येते. मात्र दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचविण्यासाठी पावसाळ्यात अनेक कारखान्यातून हे सांडपाणी प्रक्रि या न करताच परस्पर, कारखान्याबाहेर सोडले जात आहे. या प्रदूषणकारी कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तीन फिल्ड आॅफिसर्स प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात असतानाही औद्योगिक क्षेत्रातील राजरोसपणे सुरु असलेले प्रदूषण रोखण्यास प्रदूषण मंडळाला अपयश येत असल्याने ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
>औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाबाबतची ही वस्तुस्थिती सत्य असून प्रक्रिया न करताच परस्पर कारखान्याबाहेर सांडपाणी सोडणाऱ्या कारखानदारांवर चौकशी करून कठोर कारवाई करू.
- सागर औटी,
उपविभागीय अधिकारी, प्रदूषण मंडळ

Web Title: Tumbles drained by the sewage to Mahad MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.