प्रशासनामुळे तुंबले पाणी
By admin | Published: August 3, 2016 03:19 AM2016-08-03T03:19:53+5:302016-08-03T03:19:53+5:30
घोडबंदर परिसरात तुंबलेल्या पाण्याकरिता ठाणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले
ठाणे : मुसळधार पावसामुळे ठाण्यातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या घोडबंदर परिसरात तुंबलेल्या पाण्याकरिता ठाणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले आहे. या परिसरात रस्त्याखालून अथवा बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले कल्व्हर्ट लहान आकाराचे असल्यानेच या परिसरात पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला आहे. यामुळे आता महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागात तू-तू मै-मै होण्याची चिन्हे दिसत आहेत.
रविवारी दोन तासांत झालेल्या २०० हून अधिक मिमी पावसामुळे येऊरच्या डोंगरांमधून वाहत आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने घोडबंदर मार्गावरील उच्चभ्रू वसाहतींना वेढले. हिरानंदानी इस्टेट, विजयनगरी, लोढा, रु स्तमजी अशा वसाहतींमध्ये भरपूर पाणी साचले होते. मोकळ्या जागांवर एकामागोमाग गगनचुंबी इमारती उभारण्याची जणू स्पर्धाच गेल्या काही वर्षांत या भागात सुरू आहे. हे करत असताना येथील पायाभूत सुविधांच्या नियोजनाचा मात्र पार बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, घोडबंदर परिसरात महापालिकाच्या रस्त्यांचे अथवा सर्व्हिस रोडचे काम करताना महापालिकेने मोठे कल्व्हर्ट टाकण्याचा दावा केला होता. त्याउलट, येथील मोठ्या रस्त्यांच्या खालून पाणी जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले कल्व्हर्ट मात्र लहान असल्याने वेगाने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून संबंधित कल्व्हर्ट मोठे करण्याविषयी चर्चा करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.
सध्या देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असले तरी ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरील वसाहतींमध्ये घरांचे दर चढेच राहिले आहेत.
>घोडबंदर येथील नागरी सुविधांची पोलखोल
मुंबईतील पश्चिम उपनगरांशी असलेली जवळीक आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गास असलेल्या जोडरस्त्यामुळे घोडबंदर मार्गाला दळणवळणाच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काही वर्षांपूवी या रस्त्याचे रु ंदीकरण केले. रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतरही येथील वाहतूककोंडी कमी झालेली नाही. घोडबंदरला लागूनच गेल्या काही वर्षांत मोठ्या बिल्डरांचे टॉवर्स उभे राहत आहेत. परंतु, रविवारच्या पावसाने येथील लब्धप्रतिष्ठितांना घराबाहेर साठलेल्या गुडघाभर पाण्यामुळे दिवसभर घरात अडकवून ठेवल्याने येथील नागरी सुविधांची पोलखोल झाली आहे.