सेनेचा ‘एकला चलो’चा सूर
By admin | Published: April 4, 2016 03:22 AM2016-04-04T03:22:09+5:302016-04-04T03:22:09+5:30
जनतेच्या कामासाठी आपण सत्तेत आहोत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करा. यापुढे आपल्याला एकटे लढायचे आहे.
मुंबई : जनतेच्या कामासाठी आपण सत्तेत आहोत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करा. यापुढे आपल्याला एकटे लढायचे आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेची कामे वेगाने सुरू करा, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’ची हाक दिली.
मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना उमेदवार, जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना नेते आणि मंत्र्यांची बैठक रविवारी शिवसेना भवनात पार पडली. राज्यभरातून शिवसेनेचे तब्बल २०० माजी आमदार, पराभूत उमेदवार या बैठकीला हजर होते. या वेळी बोलताना उद्धव यांनी शिवसेनेची आगामी दिशा स्पष्ट करत स्वबळावरील वाटचालीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला मदत केली. आता तीच भाजपा शिवसेना संपवायला निघाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने देशभरातील शक्ती, सत्ता महाराष्ट्रात शिवसेना संपवायला आणली होती, ते असे करतील असे वाटले नव्हते. यापुढे आपल्याला एकटे लढायचे आहे. सर्वांनी आपापल्या मतदारसंघात तयारीला लागावे. मतदारसंघातील जनतेची कामे वेगाने सुरू करा. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन उद्धव यांनी बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वेळी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती काही पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावरही बैठकीत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिक युतीबाबत स्वतंत्र धोरण
नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेनेला युतीची गरज वाटत नाही़ तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे स्वातंत्र्य भारतीय जनता पार्टीने यापूर्वीच दिलेले आहे़ त्यामुळे या दोन्ही निवडणुका शिवसेना व भाजपा स्वतंत्रपणे लढवतील, असे खडसे म्हणाले.
> भारत-वेस्ट इंडिज उपांत्य सामना पाहायला मीही गेलो होतो. गेल बाद झाल्यावर भारतच जिंकणार, असा सर्वांना विश्वास होता. मात्र नंतर आलेल्या सिमन्सने चिकाटीने फलंदाजी करत चौकार, षटकार ठोकले आणि वेस्ट इंडिजने यशाकडे वाटचाल केली. ध्येय समोर ठेवून वाटचाल केली तर यश मिळणारच! विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी आपल्याला अशाच चिकाटीने काम करायचे आहे. तेच आपले ध्येय आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना धडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
> सत्तेत राहायचा निर्णय
सेनेने घ्यावा - खडसे
नाशिक : एकीकडे सत्तेत राहून सर्व मंत्रिपदे भूषवायची अन् दुसरीकडे भाजपाचा विरोध करायचा यावरून शिवसेनेची संभ्रमावस्था दिसून येते़ सत्तेत राहायचे की बाहेर पडायचे या निर्णयाबाबत सेनेने आपले धोरण स्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे सांगितले. नाशिकच्या धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून सेनेने भाजपाविरुद्ध काढलेला मोर्चा, भाजपाच्या महिला सन्मान सोहळ््यात सेनेने घातलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, शिवसेनेला हेच कळत नाही की, आपण सत्तेत आहोत की विरोधात़ युती म्हटली की, कुरबुरी या आल्याच. त्या दोन्ही पक्षांनी मिटवायच्या असतात़