शुल्क घेऊनही तुंगारेश्वरला सुरक्षेची वानवा
By admin | Published: July 19, 2016 03:26 AM2016-07-19T03:26:17+5:302016-07-19T03:26:17+5:30
वसई पूर्वेकडील डोंगराच्या दाट अभयारण्यात असलेल्या तुंगारेश्वर आणि चिंंचोटी येथील धबधबे सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
शशी करपे,
वसई- वसई पूर्वेकडील डोंगराच्या दाट अभयारण्यात असलेल्या तुंगारेश्वर आणि चिंंचोटी येथील धबधबे सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहेत. शनिवार आणि रविवारी याठिकाणी पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, अतीउत्साही पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिशय धोकादाक असलेल्या या धबधब्यांमध्ये बुडून गेल्या तीन वर्षांत दहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्याचा आनंद लुटताना स्वत:च्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी आणि रविवारी तर सकाळपासूनच गर्दी ओसंडून वाहत असते. फेसाळणारे पाणी आणि चोहोबाजूंनी दाट वनराई यामुळे इथला निसर्ग मनमोहून टाकणारा असतो. धबधब्याची मजा लुटून दाट वनराईत फेरफटका मारण्याचा आनंद काही औरच असतो. दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यानंतर संध्याकाळ कधी होते याचे भान रहात नाही.
धबधब्यात डुंबण्याचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना पोलीस आणि वनखात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. धबधबे सुंदर आणि मनमोहक असले तरी धबधब्याच्या खोलीचा व त्यात असलेल्या कपारींचा अंदाज येत नाही. त्यामुळे अती उत्साहात पाण्यात उड्या मारल्यास जीव गमावण्याचा धोका असतो. येथे येणाऱ्या पर्यटकांकडून वनखाते प्रवेश फी आकारते. मात्र, पर्यटकांसाठी कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. याठिकाणी सुरक्षिततेसाठी पोलीस अथवा वनखात्याचे रखवालदार नसतात.
>सुरक्षेच्या अभावी २०१३ ते २०१५ या कालावधीत तुंगारेश्वर धबधब्यात ३ तर चिंचोटी धबधब्यात बुडून ७ पर्यटकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे हे दोन्ही धबधबे पिकनिक स्पॉट बनण्याऐवजी डेथ स्पॉट बनत आहेत.