तुर्भे डम्पिंगप्रश्नी महसूलमंत्र्यांना साकडे
By admin | Published: March 1, 2017 02:49 AM2017-03-01T02:49:33+5:302017-03-01T02:49:33+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी स्थानिक नगरसेवकांसह राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. डम्पिंगच्या दुर्गंधीतून या परिसरातील रहिवाशांची सुटका करावी, अशी विनंती केली. दरम्यान, यासंदर्भात लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री पाटील यांनी दिल्याचे आमदार म्हात्रे यांनी कळविले आहे.
तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पेटला आहे. या परिसरातील रहिवाशांनी त्याविरोधात आंदोलन छेडले आहे. डम्पिंगमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हे डम्पिंग अन्यत्र हलवावे, अशी येथील रहिवाशांची जुनी मागणी आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी व औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता, तसेच राज्य स्तरावर एकदा पाठपुरावा केला होता. त्यामुळे सरकारने यासंदर्भात अहवाल करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. मात्र, महापालिकेने दिलेला अहवाल राज्य शासनाची दिशाभूल करणारा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, मंगळवारी स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी, नगरसेविका राधा कुलकर्णी, नगरसेविका संगीता वास्के, मुद्रिका गवळी आदीसमवेत महसूल, मदत-पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नांवर चर्चा केली. तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री पाटील यांनी दिल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)