तुर्भेतील वस्तीत अघोरी प्रकार !

By admin | Published: June 24, 2016 03:52 AM2016-06-24T03:52:43+5:302016-06-24T03:52:43+5:30

तुर्भे नाका हनुमाननगर झोपडपट्टीमध्ये बुधवारी रात्री नरबळीच्या चर्चेने खळबळ उडाली. टेकडीवरील एका घरामध्ये दोन ठिकाणी जवळपास पाच फूट लांब व दोन फूट रूंद खड्डे खणले आहेत

Turbhe dwelling abhori type! | तुर्भेतील वस्तीत अघोरी प्रकार !

तुर्भेतील वस्तीत अघोरी प्रकार !

Next

नामदेव मोरे,  नवी मुंबई
तुर्भे नाका हनुमाननगर झोपडपट्टीमध्ये बुधवारी रात्री नरबळीच्या चर्चेने खळबळ उडाली. टेकडीवरील एका घरामध्ये दोन ठिकाणी जवळपास पाच फूट लांब व दोन फूट रूंद खड्डे खणले आहेत. रात्री या ठिकाणी अघोरी पूजा सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी जावून पाहणी केली असता घरातील व्यक्तींनी सर्व पूजेचे साहित्य टाकून पलायन केले.
ठाणे - बेलापूर रोडला लागून असलेल्या झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडला आहे. टेकडीवर असलेल्या घरामध्ये दोन महिन्यांपूर्वी खड्डा खणून त्यामध्ये काहीतरी पुरल्याची चर्चा सुरू झाली होती. नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी दोन बकऱ्यांचा व कोंबडीचा बळी देवून त्या खड्ड्यात पुरल्या आहेत. या प्रकाराविषयी रहिवाशांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. याविषयी चाहूल लागताच घरातील सदस्यांनी तेथून पलायन केले होते. बाहेर नातेवाइकांकडे त्यांनी आश्रय घेतला होता. वटपौर्णिमेच्या रात्री याठिकाणी पुन्हा खड्डा करण्यास सुरवात केली.
जवळपास दोन फूट रूंद व पाच फूट लांब, चार फूट खोल खड्डा खोदला आहे. सलग तीन दिवस खड्डा करण्याचे काम सुरू होते. बुधवारी रात्री घरामध्ये पूजेचे साहित्य आणले होते. यामध्ये लिंबू, टाचणी, फुले व इतर वस्तूंचा समावेश आहे. कोंबड्याही त्यांच्याबरोबर असल्याची चर्चा होती.
रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घरामध्ये अघोरी पूजा सुरू असून नरबळी दिला जाणार असल्याची चर्चा परिसरात पसरली. यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्या ठिकाणी जावून खिडकीतून पाहिले असता मोठा खड्डा करून त्याच्या बाजूला पूजेचे साहित्य ठेवल्याचे लक्षात आले.
घरातील सदस्यांना दरवाजा उघडण्यास सांगितले असता त्यांनी दुसऱ्या दरवाजाने पळ काढला. पोलिसांना बोलावून नागरिकांनी घरात प्रवेश केला. घरामध्ये दोन ठिकाणी खड्डा केल्याचे निदर्शनास आले. यामधील एका ठिकाणचा खड्डा बुजविण्यात आला होता. नरबळी देण्याचा किंवा इतर अघोरी जादूटोणा करण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गुरूवारी दिवसभर याविषयी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. या ठिकाणी पोलिसांनी तपासणीही केलेली नसल्याचे समजले.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही. झालेल्या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील नागरिकांनी लहान मुलांनाही घटना घडलेल्या घरांकडे जाण्यास बंदी घातली आहे. याविषयी सखोल चौकशी करावी. बुजविलेला खड्डा उकरून त्यामध्ये काय पुरले आहे याची माहिती घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.


पौर्णिमेच्या दिवसापासून या घरामध्ये खड्डे खोदले जात होते. बुधवारी रात्री तेथे काहीतरी पूजा केली जाणार असल्याची चर्चा होती. नागरिकांनी जावून पाहणी केली असता दोन खड्डे खोदल्याचे व बाजूला पूजेचे साहित्य असल्याचे पहावयास मिळाले. नरबळीच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
- शिवाजी जाधव,
सामाजिक कार्यकर्ते, हनुमाननगर

‘रात्रीस खेळ चाले’
घराला दोन बाजूला दरवाजे आहेत. एका बाजूला खिडकीमधूनही घरात प्रवेश करण्याची सोय आहे. घरातील सदस्य रात्री येथे येत, कधी खिडकीतून आतमध्ये जात. काही वेळेला दरवाजा उघडून आतमध्ये जात, दुसऱ्या बाजूने बाहेर येवून आत आलेल्या दरवाजाला टाळे लावून आतमध्ये जात. पहाटेपूर्वी पुन्हा निघून जात. यामुळे परिसरात ‘रात्रीस खेळ चाले’ अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

देवपूजा
आवडत नव्हती
शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, येथे राहणारी व्यक्ती आमच्या घरात येत नव्हती. आम्ही देवपूजा करतो म्हणून त्यांना राग येत असे. ते देव मानत नव्हते. देवपूजेवरही विश्वास नसल्याचे वारंवार सांगत. असे असताना स्वत:च्या घरामध्ये खड्डे करून पूजा केली जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे.

Web Title: Turbhe dwelling abhori type!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.