तूर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात!
By Admin | Published: April 18, 2017 12:51 AM2017-04-18T00:51:33+5:302017-04-18T01:58:20+5:30
खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदी घोळ प्रकरणाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे.
कबुली जबाबामुळे सचिव अडचणीत !
खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदी घोळ प्रकरणाचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे. उपनिबंधकांच्या प्राथमिक चौकशीत कृउबासच्या रजिस्टरमध्ये घोळ आढळून आल्याने, या संपूर्ण प्रकरणाची फाइल वरिष्ठांकडे सादर करण्यात आली आहे.
खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर विभागीय निबंधक, सहा. उपनिबंधक, उपनिबंधक यांच्या चौकशीत कृउबासच्या दस्तावेजांमध्ये घोळ असल्याचे आढळले होते. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी हे दस्तावेज ताब्यात घेतले होते. अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीमुळे बाजार समितीचे पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
लेखी जबाबामुळे सचिव अडचणीत!
चौकशीदरम्यान तूर खरेदीचे नोंद रजिस्टर उपलब्ध करण्यास टाळाटाळ करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करणे, सोबतच नोंद रजिस्टर सभापतींकडे असल्याचा लेखी जबाब देणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्याचा उल्लेखच नाही!
नोंद रजिस्टरवर शेतकऱ्यांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याचे ताब्यात घेतलेल्या दसवेजांवरुन स्पष्ट होत आहे. रजिस्टरमधील खाडाखोड आणि पाने फाडल्याचे निदर्शनास आले असून, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर आक्षेप नोंदविले आहेत.
शासनाच्या ध्येयधोरणाला कृउबासमधील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी हरताळ फासला आहे. रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यास करण्यात आलेला विलंब, खाडाखोड, शेतकऱ्यांच्या नावांचा नसलेला उल्लेख आदी बाबींमुळे अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. जप्त रेकॉर्डची विभागीय निबंधकांकडून चौकशी सुरू आहे. तूर खरेदीची उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी आपली मागणी आहे.
- आ. अॅड. आकाश फुंडकर, खामगाव
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी होईपर्यंत इतर कोणत्याही वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कृउबासच्या संशयास्पद दस्तऐवजाची तपासणी करण्यात येत असून, संबंधित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल.
- एम.ए.कृपलानी, सहा. उप निबंधक, खामगाव.