३०० रुपयांत हळदबेणे लागवडीचे यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:35 AM2018-10-08T11:35:29+5:302018-10-08T11:40:10+5:30
ग्रासरुटइनोव्हेटर : युवा शेतकरी साहेबराव नागोराव केशेवार यांनी कल्पकतेने मिनी ट्रॅक्टरवर तीनशे रुपयांच्या खर्चात हळद बेणे, बटाटे, अद्रक लावण्याचे यंत्र तयार केले आहे.
- प्रा.शरद वाघमारे (मालेगाव, जि.नांदेड)
सद्यस्थितीत हळद पीक नगदी पीक म्हणून शेतकरी लागवड करीत आहेत; परंतु पारंपरिक पद्धतीने हळदीचे पीक घेताना खर्चाच्या मानाने उत्पन्न मिळत नाही. एकीकडे खर्च जास्त त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. या पार्श्वभूमीवर अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील युवा शेतकरी साहेबराव नागोराव केशेवार यांनी पारंपरिक पद्धतीने हळद बेणे लागवडीला फारकत देत स्वत:च्या कल्पकतेने मिनी ट्रॅक्टरवर अगदी कमी म्हणजे तीनशे रुपयांच्या खर्चात हळद बेणे, बटाटे, अद्रक लावण्याचे यंत्र तयार केले आहे. यामुळे लागवडीसाठी लागणारा मजुरांचा खर्च वाचून कमी वेळात हळद बेणे लागवड करता येईल, अशा पद्धतीचे पेरणी यंत्र तयार केले आहे.
यासाठी केशेवार यांनी तीन इंच पी.व्ही.सी. पाईप, मोगडा या साहित्याचा वापर केला आहे. मिनी ट्रॅक्टरवर दोन मोगड्यांचा वापर करून त्याला दोरीच्या साह्याने बांधले आहे. हळदीसाठी मोगड्यात एक फुटाचे अंतर ठेवले. यासाठी केशेवार यांना केवळ तीनशे रुपये खर्च आला. हळद, बटाटा, अद्रक लागवड करताना या यंत्राच्या साहायाने फक्त दोन मजूर व एक ट्रॅक्टर चालक लागते. एरवी शेतकरी हळद लागवड करताना एक एकर हळद लागवडीसाठी तीन दिवस लागतात. त्यात वेळ आणि खर्च ही जास्त लागतो.
किमान आठ मजूर आणि दिवसाची मजुरी किमान बाराशे रुपये येते; परंतु केशेवार यांनी हळद बेणे लागवडीसाठी तयार केलेल्या या यंत्रावर एक एकर हळद लागवडीसाठी एकरमध्ये केवळ दोन तासांच्या आत हळद लागवड होते. या पद्धतीने लागवड केल्यास लागवडीचे काम केवळ दोन तासांत होते. केशेवार यांनी स्वत:च्या कल्पकतेने बनविलेले हळद लागवडीचे यंत्र शेतकऱ्यांना सद्य:स्थितीत कमी खर्चात व कमी वेळेत हळद, अद्रक, बटाटे पिकाच्या लागवडीसाठी निश्चितच फायदेशीर ठरते आहे.