सरकारच्याच कानाखाली तूर‘जाळ’ निघण्याची आफत - उद्धव ठाकरे

By admin | Published: April 26, 2017 07:38 AM2017-04-26T07:38:29+5:302017-04-26T07:41:05+5:30

धोरण बदललं नाही तर एका जाहिरातीप्रमाणे ‘तूरडाळीचा तडका और अंग अंग भडका’ असा अनुभव घ्यावा लागेल अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे

The turmoil of leaving the government behind the ears - Uddhav Thackeray | सरकारच्याच कानाखाली तूर‘जाळ’ निघण्याची आफत - उद्धव ठाकरे

सरकारच्याच कानाखाली तूर‘जाळ’ निघण्याची आफत - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - एकीकडे शेती उत्पादकता वाढवण्याच्या गोष्टी सत्ताधारी करीत आहेत आणि दुसरीकडे उत्पादकता वाढूनही तूरडाळ उत्पादकांना जर पडलेले भाव आणि थांबलेल्या खरेदीला तोंड द्यावे लागत असेल तर कसे व्हायचे? खरेदी केंद्रांवर नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांची तूरडाळ खरेदी करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला ते चांगलेच झाले. त्यामुळे तूरडाळीचा ‘तडका’ काहीसा शांत होईल. मात्र तो पुन्हा होऊ नये यासाठी ‘बाजारात तुरी आणि…’ हे धोरण सरकारला बदलावे लागेल. अन्यथा त्या एका जाहिरातीप्रमाणे ‘तूरडाळीचा तडका और अंग अंग भडका’ असा अनुभव घ्यावा लागेल अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे.
 
आपल्या देशात दुष्काळ असला तरी शेतकरी भरडला जातो आणि दुष्काळ नसला तरी नागवला जातो. कधी व्यापा-यांकडून, कधी अडते-दलालांकडून तर कधी सरकारी पातळीवरील नियोजनाच्या ऐशीतैशीमुळे शेतकऱ्याचे भरडणे सुरूच राहते. खरं तर यंदा तूरडाळ उत्पादन भरघोस झाल्याने शेतकरी खुशीत होता, पण तूरडाळ खरेदीतील गोंधळामुळे त्याची प्रचंड ससेहोलपट झाली. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ त्याच्यावर आली. या गोष्टीही टाळता येण्यासारख्याच होत्या. योग्य नियोजन झाले असते, त्यानुसार धोरणात सुसूत्रता राखली गेली असती तर ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल दराने ३०-३५ लाख टन तूरडाळ खरेदी करूनही सरकारच्याच कानाखाली तूर‘जाळ’निघण्याची आफत आली नसती असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
राज्यातील शेतकरी परिस्थितीच्या कचाटय़ात कसा सापडला आहे ते तूरडाळ खरेदीच्या गोंधळामुळे पुन्हा दिसले. विषय कांदा उत्पादकांच्या अनुदानाचा असो, कापूस एकाधिकार खरेदीचा असो, तूरडाळ खरेदीचा असो किंवा धान्याच्या आयात-निर्यातीवरील बंधनांचा; शेतकऱ्याची ससेहोलपट झाल्याशिवाय किंवा तो रस्त्यावर उतरल्याशिवाय त्याच्या पदरात काही पडतच नाही अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 
 
संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्नही असाच शेतकऱ्याच्या मानेभोवती फास बनूनच राहिला आहे. आता भरघोस उत्पादन येऊनही पडलेला भाव आणि खरेदीतील सरकारी गोंधळ या चरकात तूर उत्पादक पिळला जात आहे. त्याला दिलेला ‘खरेदीचा हात’ सरकारला मध्येच सोडता येणार नाही. ‘शेवटचा दाणाही खरेदी करू’ हे आश्वासन पूर्ण केले नाही तर शेतकरी राज्य सरकारवर विश्वास कसा ठेवणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
गेल्या वर्षी तूरडाळ उत्पादन कमी झाल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी या पिकाला प्राधान्य दिले. सरकारनेही त्यासाठी उत्तेजन दिले आणि निसर्गानेही शेतक-याच्या पदरात भरभरून दान टाकले. तरीही त्याची ससेहोलपट होणार असेल तर तूर लावण्याची ‘चूक’ तो कदाचित करणार नाही आणि तूरडाळीच्या दुष्काळाचे व भाववाढीचे संकट उद्या पुन्हा उभे राहील. सरकारने आयात-निर्यातीत पैसा घालवण्यापेक्षा सामान्य शेतकऱयाच्या खिशात त्याने कष्टाने पिकवलेल्या पिकाचे हक्काचे ‘देणे’ कसे पडेल याचा विचार करायला हवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

Web Title: The turmoil of leaving the government behind the ears - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.