अभिव्यक्तीवरील हल्ल्याकडे कानाडोळा
By admin | Published: February 5, 2017 04:08 AM2017-02-05T04:08:48+5:302017-02-05T04:08:48+5:30
वर्तमानातील दमनशाही, उजव्या विचारांचा वाढता प्रभाव, पुतळा फोडण्यासारख्या घटनांतून अभिव्यक्तीसमोर निर्माण झालेले प्रश्न आणि समकालीन साहित्यावर
पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : वर्तमानातील दमनशाही, उजव्या विचारांचा वाढता प्रभाव, पुतळा फोडण्यासारख्या घटनांतून अभिव्यक्तीसमोर निर्माण झालेले प्रश्न आणि समकालीन साहित्यावर संमेलनाध्यक्षांच्या भाषणात अवाक्षर नसल्याबद्दल शनिवारी विविध मान्यवरांनी टीकेचा सूर लावला.
समकालीन साहित्यातील प्रवाह, समाजातील विविध प्रश्नांवर भाषणात भाष्य नसल्याने, भूमिका घेतलेली नसल्याने असे भाषण २० वर्षांपूर्वीही चालले असते किंवा अजून २० वर्षांनंतरही असेच चालेल, अशी रोखठोक टीकाही मीमांसेदरम्यान करण्यात आली.
साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर चर्चेचा पायंडा मागील अधिवेशनापासून पडला. यंदाचे संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या ४० पानी भाषणाची समीक्षा सावित्रीबाई फुले कलामंदिरात शनिवारी झाली. त्यात भानू काळे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते, विजय चोरमारे सहभागी झाले. श्याम जोशी त्याचे समन्वयक होते. या चर्चेवेळी काही काळ संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे प्रेक्षकांत बसून चर्चा ऐकत होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणे, मराठी भाषेबाबत विचार, लेखकाच्या निर्मितीची प्रक्रिया, आस्वादाची-वाचक घडवण्याची, रसिक तयार करण्याची प्रक्रिया, वाचकांची जबाबदारी, समीक्षा व्यवहार याबाबत अध्यक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांना सर्वांनी स्पर्श केला.
अध्यक्षांच्या भाषणात वर्तमानाचा संदर्भ हवा होता. आजचे साहित्य, लेखक, साहित्याचा प्रवास कोणत्या अंगाने सुरू आहे, याबाबत अध्यक्ष काहीच बोलत नाहीत. ताजे संदर्भ, महत्त्वाच्या कलाकृतींचा ऊहापोह करीत नाहीत, याकडे विजय चोरमारे यांनी लक्ष वेधले आणि असे भाषण २० वर्षांपूर्वी किंवा अजून २० वर्षांनंतर केव्हाही चालू शकले असते, अशा शब्दांत त्यातील उणिवांवर बोट ठेवले. हे भाषण अन्य भाषांचा द्वेष शिकवत नाही. पण ऐतिहासिक, पौराणिक साहित्याच्या फुग्याला टाचणी लावते, हा मुद्दा त्यांनी मांडला.
भाषेला वाचवा, अशी ओरड करणारेच भाषेसाठी मारक असतात, अशी बोचरी टीका करत प्रदीप दाते यांनी यापुढे नुसता विचार मांडून चालणार नाही, तर भूमिकाही घ्यायला हवी, यावर भर दिला. अध्यक्षांनी मुद्दे मांडले, पुढे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आणि बदलांसाठी, सुधारणेसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यायला हवे, असा आग्रह धरला.
इंग्रजीच्या अतिक्रमणाकडे अध्यक्षांनी लक्ष वेधले असले, तरी त्यांनी इंग्र्रजीचा द्वेष करा, असे न सुचवता मराठी, हिंदी, इंग्रजी या त्रिभाषा सूत्रावर भर दिल्याकडे अनिल नितनवरे यांनी लक्ष वेधले. केवळ उच्चभ्रू नव्हे, तर सर्वच जातींनी, समाजाने मराठीपेक्षा इंग्रजीची कास धरली आहे. त्यामुळे भाषांत सुवर्णमध्य साधण्याच्या अध्यक्षांच्या भूमिकेला त्यांनी दुजोरा दिला आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, याकडे बोट दाखवले. अभिरुचीचे बराकीकरण नको आणि भाषाशुद्धीचे स्तोम नको, या अध्यक्षांच्या भूमिकेचेही त्यांनी समर्र्थन केले.
गेल्या १० वर्षांत साहित्य गुणात्मक होते आहे. पण, त्याची दखलही न घेत त्याकडे कानाडोळा केला जातो, असे सांगत रामचंद्र काळुंखे यांनी समकालीन साहित्याचा भाषणात आढावा नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला. परप्रांतीयांना मराठी शिकवण्याबद्दल ठोस भूमिका जरी भाषणात नसली, तरी इंग्रजीबद्दलतडजोडीचा भूमिका हा नवा मुद्दा आहे. तसेच भाषांतराच्या रूपाने सध्या तयार होत असलेल्या रद्दीवरही लक्ष द्यायला हवे, याचा उल्लेख त्यांनी केला.
संमेलन, अध्यक्षीय भाषणाबद्दल आपण अनेक मुद्दे उपस्थित करीत असलो, तरी जे बदल आपण सुचवतो, ते प्रत्यक्षात आणणारी कोणताही यंत्रणा आपल्याकडे नसल्याने किंवा प्रशासकीय यंत्रणेपर्यंत आपण पोहोचत नसल्याने साहित्यात, भाषेत हवे तसे परिवर्तन घडत नाही, असे भानू काळे यांनी उदाहरणासह सांगितले. साहित्यावरील समीक्षा ही अनेकदा औदार्य दाखवणारी नसते, असा उल्लेख त्यांनी केला.
स्वत: प्रकाशित केलेल्या साहित्याचा मुद्दाही चर्चेत घ्यायला हवा, असे त्यांनी सुचवले. मुद्रितशोधनाचा खालावलेला दर्जा, पुस्तकांच्या प्रती काढण्याच्या खर्चाचा संदर्भ देत त्यांनी साहित्यावरील अर्थकारणाच्या प्रभावाचाही विचार व्हायला हवा, असे सुचवले.
(विशेष प्रतिनिधी)
अंमलबजावणीचा आढावा घ्या!
साहित्य संमेलनात केलेल्या ठरावांचे पुढे काय होते, याचा शोध पुढील अधिवेशनात घ्यायला हवा, असे शि.म. परांजपे यांनी सुचवले होते. त्याच धर्तीवर अध्यक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांचे, त्यांच्या भाषणाचे पुढे वर्षभरात काय झाले.
त्यातील कोणत्या गोष्टी मार्गी लागल्या, कोणत्या प्रश्नांवर सरकार किंवा प्रशासकीय यंत्रणेने काय निर्र्णय घेतले, अशा अर्थाने त्याचीही पुढील अधिवेशनात चर्चा व्हायला हवी, असा मुद्दा काळुंखे आणि चोरमारे यांनी मांडला.
त्यावर, भानू काळे यांनी अशी चर्चा झाली, तर निष्कर्ष फारसे उमेद देणारे नसतील, असे मत मांडले. कारण, आपण जी चर्चा करतो, तो बदल घडवून आणणारी यंत्रणा आपल्याकडे नाही, असे निदर्शनास आणले.
अध्यक्ष म्हणून जे निवडले गेले आहेत, त्यांच्या भाषणासोबतच साहित्यावर त्याच अधिवेशनात चर्चा घडवण्याचा प्रघात सुरू व्हायला हवा. तसे झाले, तर सुमार साहित्यिक अध्यक्ष होण्यापासून दूर राहतील, असा टोला चोरमारे यांनी लगावला.