'रात्रीस खेळ चाले' बंद करा - शिवसेना
By admin | Published: March 2, 2016 03:25 PM2016-03-02T15:25:54+5:302016-03-02T15:26:43+5:30
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेविरोधात चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिवसेनेने या मालिकेविरोधात आंदोलन छेडले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेविरोधात चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिवसेनेने या मालिकेविरोधात आंदोलन छेडले आहे. ही मालिका तात्काळ बंद करावी या मागणीसाठी बुधवारी शिवसैनिकांनी लोअर परेल येथील झी मराठी वाहिनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या मालिकेतून भूत-प्रेत, आत्मे आणि देवदेवस्की सारख्या अंधश्रध्दांना खतपाणी घातले जात असून, त्यामुळे कोकणची बदनामी होत असल्याचा आक्षेप घेत शिवसेनेने या मालिकेविरोधात बुधवारी आंदोलन केले.
कोकणताल्या काही संघटनांनाही या मालिकेमुळे कोकणची बदनामी होत असल्याचा दावा करत मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. या मालिकेमुळे कोकणातल्या पर्यटन व्यवसायाला फटका बसू शकतो अशी भितीही काही जणांनी व्यक्त केली आहे. मागच्या आठवडयापासून सुरु झालेली ही मालिका हळूहळू रंगतदार वळणावर येत असताना या मालिकेविरोधात आंदोलने सुरु झाल्यामुळे आता या मालिकेचे काय होणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाभोवती एक गूढ असून, काही अदृश्य शक्तींमुळे ब-याचवर्षांपासून या कुटुंबात कुठलेही मंगल कार्य झाले नसल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. या कुटुंबातील एका मुलाचा साखरपुडा होणार असतो. त्याची लगबग सुरु असते. मात्र त्यापूर्वीच कुटुंबप्रमुखाचे अचानक निधन होते आणि त्यानंतर एकपाठोपाठ एक धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. पुढच्या भागात कोकणची चांगली बाजू दाखवू अस आश्वासन मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी दिल आहे.