उजनीतून भिमेत पाणी सोडण्याचे केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 12:30 PM2019-08-16T12:30:07+5:302019-08-16T12:40:43+5:30
वीर धरणातील विसर्ग वाढविला; बोगद्यातून सीना नदीत पाण्याचा प्रवाह संथ
सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे शुक्रवार सकाळपासून बंद करण्यात आले आहे.
उजनी धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे तर वीर धरणातील विसर्ग कमी झाल्यामुळे भीमेतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. वीर धरणातून नीरेत ४८८७ कुसेक्स विर्सग सुरू असताना शुक्रवारी पुन्हा धरण क्षेत्रात पाणी येत आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेनंतर विर्सगात वाढ करून १४ हजार १६१ पर्यंत नेण्यात आला आहे. धरणांमधील पाण्याची अशी स्थिती असताना जिल्ह्यातील शेतकरी मात्र पाऊस आणि उजनीच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. सीनेत सोडलेले पाणी अत्यंत संथ गतीने पुढे सरकत आहे. हीच स्थिती कालव्यांची आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणांची पाणी स्थिती पुढीलप्रमाणे आहे. विर्सग बंद करण्यात आलेले धरणे: टेमघर, वारसगाव, पवणा, कासारसाई, भामाआसखेड, वडीवळे, पिंपळगाव जोग, माणिकहोह, येडगाव,वडज, विसापूर, उजनी. विर्सग सुरू असलेली धरणे. पानशेत: १९५४ क्युसेक्स, खडकवासला: ३४२४, मुळशी: ५000, कळमोेडी: १२९, चासकमान: १११0, आंध्रा: ९८0, गुंजवाणी: ३00, भाटघर: ८१0, नीरा देवघर: २४५८, वीर: १४१६१, डिंबे: १९२0, चिल्हेवाडी: ८४८, घोड: ११६0, बंडगार्डन: ११0६१, दौंड: ९१७५, वीरधरण: ४८८७, नीरा नरसिंगपूर: २४0१, पंढरपूर: ९३५८.
कालव्याच्या शेवटच्या भागाला अद्याप पाणी मिळालेले नाही. अनेक ठिकाणचे पाणी बंद करण्यात आल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.
एकीकडे उजनी धरण भरल्यावर नदीत पाणी सोडण्यात आले, दुसरीकडे हेच वाया जाणारे पाणी शेतीला देण्याचे चांगले नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे. दरम्यान, हिप्परगा तलावासाठी सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे़ याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरूवारी बैठक घेऊन जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांना सूचना दिल्या़