‘दाऊद’ बनण्यासाठी वळला गुन्हेगारीकडे! विद्यार्थ्यावर खुनासह १७ गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:50 AM2017-10-01T01:50:19+5:302017-10-01T01:50:41+5:30
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला डोळ्यासमोर ठेवून अमळनेर येथील शुभम मनोज देशमुख (१९) हा विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळला. कोवळ्या वयातच त्याच्याविरुद्ध खुनासह तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
- सुनील पाटील
जळगाव : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला डोळ्यासमोर ठेवून अमळनेर येथील शुभम मनोज देशमुख (१९) हा विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळला. कोवळ्या वयातच त्याच्याविरुद्ध खुनासह तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. जळगाव पोलिसांनी गुुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरातून त्याच्या मुसक्या आवळल्या.
अमळनेर येथे झालेल्या मोठ्या घरफोड्यांमध्ये शुभमचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर
अमळनेर पोलीस त्याच्या मागावर
होते. अमळनेरात वास्तव्य असतानाही तो अमळनेर पोलिसांना सापडत नव्हता. अखेर अथक प्रयत्नांनंतर गुरुवारी रात्री तो पोलिसांच्या
हाती लागला. एका इमारतीत शिरण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शुभमवर झडप घातली. या वेळी त्याने एका पोलिसावर सुरा उगारला. मात्र दुसºया पोलिसाने त्याला शिताफीने ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.
शुभम याचे राहणीमान उच्च आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांसोबत राहात असतानाही तो गुन्हेगार असल्याचा संशय कुणालाही आला नव्हता. जळगावच्या गिरणा टाकी परिसरात अन्य विद्यार्थ्यांसोबत एका भाड्याच्या खोलीत तो राहात होता. या मित्रांना पार्टी दिल्यानंतर त्याच विद्यार्थ्यांची दुचाकी घेऊन तो घरफोडी करायचा.
चित्रपट पाहून गुन्हेगारी कृत्ये
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला डोळ्यासमोर ठेवून शुभम नववीपासून गुन्हेगारीकडे वळला. त्याने स्वत:चे टोपण नावही दाऊदच ठेवले होते. चित्रपट पाहून तो गुन्हेगारी कृत्य करायला लागला होता. त्याचे आई व वडील शेतकरी असून त्याच्या वागण्याला ते कंटाळले आहेत. त्याला
त्यांनी घराबाहेर काढले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.