बडे नेते अडचणीत?
By admin | Published: December 9, 2015 01:19 AM2015-12-09T01:19:40+5:302015-12-09T01:19:40+5:30
पोलीस कोठडीत असलेल्या चौघा नगरसेवकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यात काही बडे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची नावे पुढे आली आहेत.
ठाणे : पोलीस कोठडीत असलेल्या चौघा नगरसेवकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यात काही बडे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे आता त्यांच्याही मागे चौकशीचा ससेमिरा लागून तेही अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, चौघांना घरचे जेवण आणि औषधे मिळावीत यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात दिलेला अर्ज मंजूर करण्यात आला. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागविले, तरी पोलिसांनी आपले म्हणणे सादर केले नाही. अखेरीस चौघांनाही घरचे जेवण, तर जगदाळे आणि सुधाकर चव्हाणांना रक्तदाब - मधुमेहाची औषधे देण्यास परवानगी दिली. चौघांना वेगवेगळ्या पोलीस कोठडीत ठेवले आहे. कधी कापूरबावडी, कधी वर्तकनगर, तर सहा. पोलीस आयुक्त कार्यालयातील कोठडीत हलवले जाते. राजकीय वजन वापरून त्यांनी पोलिसांवर दबाव आणू नये, याकरिता हा निर्णय घेतल्याचे समजते.
आयकर अधिकाऱ्यांकडेही चौकशी सप्टेंबर २०१४मध्ये आयकर विभागाने परमारांकडे धाड टाकली होती. त्या वेळी मिळालेल्या डायरीत काही नेत्यांना पैसे दिल्याच्या नोंदी होत्या. त्यासंबंधी अधिकाऱ्यांकडे चौकशी होत असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली. याशिवाय, परमार यांनी रोखीने पैसे दिल्याबाबत काही नोंदी पोलिसांकडे आहेत. ज्यांची नावे त्यात आहेत, त्या सर्वांना चौकशीसाठी ‘समन्स’ बजावले जाणार आहे.