दोनशे कोटींची उलाढाल ठप्प
By admin | Published: February 27, 2015 10:34 PM2015-02-27T22:34:05+5:302015-02-27T23:17:01+5:30
उद्योग बंदचा फटका : उद्योजकांच्या नाराजीत वाढ; तीव्र आंदोलनाचा इशारा
कुपवाड : महावितरणकडून करण्यात आलेल्या ३५ टक्के वीज दरवाढीच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) औद्योगिक वसाहतीमधून कडकडीत बंद पाळण्यात आला. इतर राज्यांच्या तुलनेत ही वाढ दुप्पट असल्याने उद्योजकांच्या नाराजीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळेच या औद्योगिक बंदला उद्योजकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमुळे सांगली परिसरातील औद्योगिक वसाहतींमधून सुमारे दोनशे कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. औद्योगिक घटकासाठी शासनाकडून यापूर्वी ७०६ कोटीचे अनुदान देण्यात येत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान दिले गेले. त्यानंतर नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप शासनाने हे अनुदान बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्यामुळे महावितरण कंपनीने महसुली तूट भरून काढण्यासाठी औद्योगिक घटकासाठी २१ टक्के दरवाढ केली. या दरवाढीमुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन झाल्यानंतर शासनाने तात्पुरते अनुदान देऊन आंदोलन शांत केले. परंतु, अचानक पुन्हा महावितरणकडून ३१ टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगास सादर करण्यात आला आहे. ही वाढही पुढील महिन्यापासून लागू होणार असल्यामुळे उद्योजकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. राज्यभर आज आंदोलने झाली.जिल्ह्यातही सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली चेंबर, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत, वसंतदादा औद्योगिक वसाहत, वाळवा चेंबर आॅफ कॉमर्स, संजय इंडस्ट्रीयल इस्टेट आदी औद्योगिक वसाहतींनी उद्योग बंद ठेवून शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला. उद्योग बंदला औद्योगिक वसाहतीमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे सांगली परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील सुमारे दोनशे कोटीहून अधिक उलाढाल ठप्प झाली आहे. ही दरवाढ शासनाने मागे न घेतल्यास संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
महाराष्ट्राची चुकीच्या दिशेने वाटचाल
वीज दर कमी झाल्याशिवाय ‘मेक इन महाराष्ट्र’चे स्वप्न साकार होणार नाही. उद्योग वाढीसाठी व इतर राज्यांशी स्पर्धा करण्यासाठी वीज दरही कमी असावे लागतात. अच्छे दिनची अपेक्षा बाळगलेल्या उद्योजकांना वाईट वागणूक मिळत आहे. मुख्यमंत्र्यांची वाटचाल महाराष्ट्र मोडण्याच्या दिशेने सुरू आहे. ही वाढ कमी न झाल्यास यापुढील कालावधित कामगारांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत, असे मत सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, कृष्णा व्हॅलीचे माजी उपाध्यक्ष सतीश मालू यांनी व्यक्त केले.
महावितरणने देशात सर्वाधिक दरवाढ केल्यामुळे उद्योजकांचे कंबरडेच मोडणार आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी कुपवाड एमआयडीसीमधील ७५ टक्के उद्योग बंद होते. बंदमुळे शंभर कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. ही दरवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार आहोत.
- शिवाजी पाटील, अध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, कुपवाड
भ्रष्टाचार लपविण्यासाठी महावितरणने ही दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे इतर राज्यांच्या उत्पादनांशी उद्योजक स्पर्धा करू शकत नाहीत. यामुळे उद्योग बंद पडतील. महाराष्ट्र देशात अग्रेसर होणार नाही. म्हणून ही दरवाढ मागे घ्यावी.
- डी. के. चौगुले, उपाध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, एमआयडीसी, कुपवाड.