शेतीतून वर्षाला तब्बल अडीच कोटींची उलाढाल; दौंड तालुक्यातील 'तरुण बळीराजा'ची जबरदस्त कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 04:22 PM2020-12-24T16:22:22+5:302020-12-24T16:33:24+5:30

मानव जात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शेतीला पर्याय नाही...   

"Turnover of Rs. 2.5 crore per annum from agriculture; successdul story of young farmer in Daund taluka! '' | शेतीतून वर्षाला तब्बल अडीच कोटींची उलाढाल; दौंड तालुक्यातील 'तरुण बळीराजा'ची जबरदस्त कमाल!

शेतीतून वर्षाला तब्बल अडीच कोटींची उलाढाल; दौंड तालुक्यातील 'तरुण बळीराजा'ची जबरदस्त कमाल!

googlenewsNext

दीपक कुलकर्णी -

पुणे : पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरीला झिडकारत कुणी गावी जाऊन शेती करण्याचा विचार केला तर त्याला नक्कीच वेडे ठरवले जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यात परंपरागत शेती करणारे कुटुंब असेल तर मग नक्कीच अशा माणसाला गावी येण्यास सहज सहमती मिळणार नाही. पण त्याने ठाम निश्चय केला. अनेकांचा विरोध पत्करून तो गावी परतला. त्याने आपल्या अडीच एकराच्या शेतीत अंजिराचे पीक घेण्याचे ठरवले. या अंजिराच्या पिकाने त्याचे असे काही नशीब पालटवले की त्याची उलाढाल बघता बघता अडीच कोटीपर्यंत पोहचली आहे.

दौंड तालुक्यातील खोर येथील डोंबेवाडीच्या त्या अवलिया शेतकऱ्याचे नाव समीर डोंबे असे आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने चार चारचौघांसारखा नोकरीचा रस्ता धरत मन मर्जी आणि सुखचैनी आयुष्य जगण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. आठ वर्षांपूर्वी तब्बल ४० हजार महिना मिळवत सुरुवात देखील जबरदस्त केली. बाहेरून कुणालाही सारे काही सुरळीत सुरु आहे असाच समज झाला असता. पण समीरच्या आतमध्ये वेगळीच घालमेल सुरु होती. त्याचं मन नोकरीत वा शहरातील लाइफ स्टाईलमध्ये समाधानी नव्हते. त्याला गावाकडील काळीमाती खुणावत होती. आणि मग त्याने कुटुंब मित्र यांचा विरोध स्वीकारत त्याने २०१३ साली नोकरीचा राजीनामा देत थेट दौंड गाठले. गावी गेल्यावर अंजिराचे पीक घेण्याचे ठरवले. स्वतःच्या कल्पनेतून नवनवीन अभिनव प्रयोगांमार्फत त्याने ही अंजिराची शेती फुलवली. पिकाचे उत्पादन करूनच न थांबता वितरण आणि विक्रीत देखील आमूलाग्र परिवर्तन घडवत व्यवसायाची नवी पद्धत अवलंबली. बाजारपेठाऐवजी थेट विक्रीला प्राधान्य दिले. 

आपल्या प्रेरणादायी वाटचालीबद्दल समीर म्हणाला,मी पुण्यातील नोकरी सोडून जेव्हा आमचे गाव गाठले तेव्हा माझ्या आई वडिलांसह सर्वानीच कपाळावर हात मारत काय खूळ डोक्यात घेऊन बसला आहे, शेतीतुन कुणाचं भलं झाले आहे का ? तुझं अजून लग्नवगैरे सगळ्या गोष्टी राहिल्या आहेत. शेती करणाऱ्या मुलाला एकतर कुणी मुलगी देत नाही. अशा अवस्थेत नोकरी सोडून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे यांसारख्या विविध गोष्टी ऐकवल्या गेल्या. पण या सर्वांना उत्तर थेट कामातून दयायचे असे ठरवून धडपड सुरु केली. 

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्याने व काही काळ पुण्यात राहिल्याने शेतीत नवनवीन बदल करण्याचे ठरवले. आमच्या शेतीत आजोबांपासून अंजिराचे पीक घेतले जात होते. पण ते बाजारपेठांमध्ये तुटपुंज्या किमतीत विकून मोकळे होत असत. मी हा दृष्टिकोन बदलत अडीच एकराच्या संपूर्ण शेतीत अंजिराचे पीक घेत आणि आपल्या मालाची विक्री आपल्या पद्धतीने करायची योजना आखली. नंतर स्वतःचा 'पवित्रक' नावाचा एक ब्रँड रजिस्टर करून घेतला. तसेच आकर्षक पॅकिंगसह ते बाजारात विक्रीला आणले.रिलायन्स,बिगबाजार, मोर, स्टार बाजार अशा सुपर मॉलमध्ये प्रॉडक्ट विक्रीस उपलब्ध आहे. तसेच मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर अशा ठिकाणी देखील अंजीर व त्याचे बाय प्रॉडक्ट पाठवणे देखील सुरु केले. यातूनच आम्ही माझी अडीच एकराची शेती पाच एकरावर नेली. तसेच मागच्या वर्षी दीड कोटींपर्यंत असलेली उलाढाल यावर्षी अडीच कोटींच्या घरात आहे. 

आगामी काळात वाईन व जामचा प्लांट टाकण्याचे नियोजन...    
आगामी काळात  वाईन व जामचा प्लांट टाकण्याचे नियोजन सुरु आहे. आता आमच्या डोंबेवाडीत जवळपास ३५ ते चाळीस शेतकऱ्यांची मिळून २०० ते २५० एकर शेती मध्ये अंजिराचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्या मालाची पारदर्शीपणे खरेदी करून कष्ट, नुकसान देखील वाचवतो.माझ्यासोबतच इतरही शेतकरी कुटुंबाला सोबत घेत त्यांचीही प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

.. तर शेतीत पण मोठी उलाढाल पण अशक्य नाही..
शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला कधीच असे वाटत नाही की आपल्या मुलाने पुढे जाऊन शेतकरी व्हावे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक कुटुंबाप्रमाणे  कुठलेही क्रांतिकारी बदल आपल्या शेती व्यवसायात न स्वीकारता पारंपरिक पद्धतीने उत्पादन व विक्रीचाच कित्ता गिरवण्यात धन्यता मानतो. त्यामुळे शेती व्यवसाय बऱ्याच प्रमाणात आहे त्याच ठिकाणी राहिला. याला नक्कीच अपवाद आहे. पण अनेक कुटुंबातील शेतकऱ्याचे मुले आपला शेती व्यवसाय सोडून पुणे, मुंबई शहर गाठतात. पण तरुण पिढीने नकारात्मकता बाजूला सारून स्वतःच्या शिक्षणाचा, अनुभवाचा उपयोग जर आपल्या परंपरागत कृषी व्यवसायासाठी केला तर नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल.  

अँग्रीकल्चरची पदवीधर मुले स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात....
आजमितीला अनेक तरुण तरुणी आपल्या अँग्रीकल्चर, इंजिनिअरिंग यासारख्या पदव्या घेऊन पुढे एमपीएससी आणि युपीएससीच्या चक्रव्यूहात अडकलेले दिसतात. वर्षानुवर्षे त्या परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची करतात. यातून काही जणांना यश देखील मिळते. पण त्यापैकी मोठ्या संख्येचा तरुण वर्ग हा उमेदीचा काळ गमावून बसतो. पण हेच जर कष्ट व शिक्षणाचा वापर त्याने शेतीत केला तर नक्कीच यश दूर नसेल.

मानव जात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शेती व्यवसायाला भीती नाही..
माणूस म्हटलं की अन्न ही मूलभूत गरज आली. माणसाला जीवन जगताना बळीराजाशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. त्यामुळे जोपर्यंत मानव जात जिवंत आहे तोपर्यंत शेती व्यवसायाला भीती नाही असे माझे ठाम मत आहे.

Web Title: "Turnover of Rs. 2.5 crore per annum from agriculture; successdul story of young farmer in Daund taluka! ''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.