कौतुकास्पद! वडिलांच्या कष्टाचं चीज; गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:00 PM2020-06-20T12:00:56+5:302020-06-20T12:01:30+5:30
तुषार शिंदे यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडिलांचा बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील अळकुटी म्हस्केवाडी रोड बहिरोबावाडी येथील तुषार निवृत्ती शिंदे यांची तहसीलदार पदी वर्णी लागली आहे. सध्या ते सध्या चंद्रपूर नगरपरिषदेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
तुषार शिंदे यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडिलांचा बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करत तुषार शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे. शिक्षण करत असताना तुषारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र त्यांनी कधी जिद्द सोडली नाही. त्यामुळे तुषारची जिद्द आणि मेहनतीचं फळ मिळल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तुषार यांनी मिळवलेल्या यशाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधुन तहसीलदारपदी निवड झाल्याने शिंदे कुटुंबियांची मान उंचावली असुन त्यांचे सर्वञ कौतुक करण्यात येत आहे.
अनेक परिस्थितिला तोंड दिले. अनेक जीवनात चढ उतार आले . पण त्यांनी कधी जिद्दी सोडली नाही. आज तो तहसीलदार झाला यांचा आम्हाला व पुर्ण अळकुटीकरानां अभिमान वाटतोय. - निवृत्ती नथू शिंन्दे (वडील)
प्रसाद चौगुले राज्यात पहिला
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण १७ संवर्गातील ४२० पदांसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात, सर्वसाधारण वर्गवारीतून साताऱ्याचा प्रसाद बसवेश्वर चौगुले याने ५८८ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पहिल्याच प्रयत्नात ५८८ गुण मिळवून संपूर्ण राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साताऱ्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असताना अनेक प्रशासकीय अधिकारी शाळेत येऊन मार्गदर्शन करायचे. या विद्यालयातच स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत झाला. आपणही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जावे, ही तेव्हापासूनच इच्छा होती. ती आज पूर्ण झाल्याचे समाधान वाटते, असेही प्रसादने सांगितले.