टीव्ही टाळला; कुटुंबाचा संवाद जपला
By admin | Published: March 2, 2015 12:08 AM2015-03-02T00:08:23+5:302015-03-02T00:13:00+5:30
हिरलगेतील देसाई कुटुंब : तीस वर्षांपूर्वीच्या निर्णयाने नात्यातील वीण झाली घट्ट, राज्यात आदर्श
संतोष मिठारी -- कोल्हापूर
शिक्षण झाले, नोकरी लागली अथवा व्यवसाय चांगला चालला आणि हातात चार पैसे आले की, घरांत सुधारणा, सुख-सोयीच्या वस्तू आणण्याची लगबग सुरू होते. त्यात प्राधान्याने दूरदर्शन संचाचा (टी.व्ही.) समावेश असतो. सुख-सोयीसाठी घेतलेला हाच टी.व्ही. पुढे कुटुंबात विसंवाद निर्माण करतो. त्याची अनेक उदाहरणे आहेत; पण याला अपवाद ठरले आहे, ते हिरलगे (ता. गडहिंग्लज) मधील देसाई कुटुंबीय. कुटुंब एकत्र राहावे, शिवाय एकमेकांमधील संवाद कायम राहावा म्हणून देसाई कुटुंबीयांनी आजतागायत घरी टी. व्ही. घेतलेला नाही.देसाई यांचे २५ जणांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यात निवृत्त विस्तार अधिकारी बाबासाहेब देसाई, हिरलगेतील सोसायटीचे अध्यक्ष मानसिंग, बँकेतील निवृत्त अधिकारी कृष्णराव, गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष आणि नोकरदार वसंतराव हे पाच भाऊ आहेत. या सर्वांची मुले-मुली सध्या भारतीय सैन्यदल, अभियंता, डॉक्टर, प्राध्यापक, नोकरी, आदी क्षेत्रांत कार्यरत आहेत. या कुटुंबाला टी. व्ही. घेणे सहजशक्य आहे; पण वडिलधाऱ्यांनी ठरविलेले टी.व्ही. न वापरण्याचे तत्त्व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पाळले आहे. सध्या टी. व्ही. म्हणजे बहुतांश जणांचा जीव की प्राण बनला आहे. एकवेळ घरच्या लोकांची विचारपूस केली जात नाही; पण टी. व्ही. मालिकांमधील पात्रे, त्यातील कथांवर तासन्-तास गप्पा, चर्चा केली जाते. विविध स्वरूपांतील मालिका, गेम-शो, आदी कार्यक्रमांनी घरा-घरांमधील संवाद कमी होत असल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा सर्वांशी संवाद कायम राहावा, एकत्रित कुटुंब कायम राहावे या उद्देशाने देसाई कुटुंबीयांनी पाळलेले हे तत्त्व आदर्शवत ठरणारे आहे.
‘अटॅचमेंट’ वाढली
घरात टी.व्ही. नसल्यामुळे दिवसभरातील आपापली कामे आटोपून
सायंकाळी कुटुंबातील सर्व सदस्य जेवण घेतल्यानंतर एकत्रित बसून गप्पा मारतात, चर्चा करतात. वैयक्तिक तसेच कौटुंबिक पातळ्यांवरील काही प्रश्नही सोडविले जातात, महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्यातून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची एकमेकांशी तसेच त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळींसमवेत ‘अटॅचमेंट’ वाढली आहे.
आमचे वडील शिक्षक होते. त्यांनी व आईने पाचही भावंडांनी कायम एकत्रित राहावे, कुटुंबात सुसंवाद राहावा यासाठी घरात टी.व्ही. न वापरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आज ३० वर्षे झाली. या निर्णयाचे पालन तिसरी पिढी करत आहे. वृत्तपत्रे, रेडिओचा वापर मनोरंजन, विविध घडामोडी समजावूून घेण्याााठी करतो. टी. व्ही. टाळल्याने कुटुंबांतील संवाद कायम आहे आणि त्याचे एक वेगळे समाधान आम्हा सर्वांना आहे.
- सुभाष देसाई