तब्बल बारा तास वीज गुल

By admin | Published: May 18, 2016 02:00 AM2016-05-18T02:00:02+5:302016-05-18T02:00:02+5:30

ऐन उन्हाळ्यात मध्यरात्री एक ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड उकाड्याने व डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले

Twelve hours of electricity gul | तब्बल बारा तास वीज गुल

तब्बल बारा तास वीज गुल

Next


देहूगाव : ऐन उन्हाळ्यात मध्यरात्री एक ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड उकाड्याने व डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले. यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयास टाळे ठोकले.
महावितरणचा भोंगळ कारभाराचा फटका हा वारंवार नागरिकांना बसत आहे. समस्यांचा पाढाच मंगळवारी पुन्हा ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांच्या पुढे वाचत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अशा विविध समस्यांबाबत ‘लोकमत’ने मागील आठवड्यात वृत्तमालिका प्रसिद्ध केली.
वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असल्याने येथील नागरिक हैराण झाले होते. तब्बल १२ तासांनतर तात्पुरत्या स्वरूपात चेंज ओव्हर घेऊन हा पुरवठा सुरळीत करण्यात आला. विद्युतपुरवठा खंडित होऊन १० तास उलटले, तरी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने सरपंच हेमा मोरे यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. या वेळी उपसरपंच सचिन साळुंके, हेमलता काळोखे, सुनीता टिळेकर, संतोष हगवणे, दिनेश बोडके, राणी मुसुडगे, संभाजी बाळसराफ उपस्थित होते.
सोमवार रात्री सुमारे एकच्या सुमारास तळवडे येथे विद्युतपुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम स्वरूप देहू-आळंदी रस्त्यावर देहू इंजिनिअरिंग कंपनीच्या जवळ तांत्रिक दोष निर्माण झाला होता. मात्र तळवडे हद्दीतील दोष दुरुस्त करून तेथील विद्युतपुरवठा पहाटेच सुरळीत करण्यात आला होता. मात्र देहूगावचा विद्युतपुरवठा १० वाजले, तरी सुरळीत झाला नव्हता. यामुळे आज गावात पिण्याचे पाणी येऊ शकले नाही. तर नागरिकांना रात्री एकपासून घरातील एसी, एअर कुलर, पंखे बंद राहिल्याने डासांसह प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याने प्रतिसाद न दिल्याने चिडलेल्या सरपंच मोरे व उपसरपंच साळुंके, सदस्य, ग्रामस्थांनी थेट कार्यालयच गाठले. तेथे त्यांना कोणीही अधिकारी न भेटल्याने वरिष्ठाशी संपर्क करून देहूकरांच्या समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अशी मागणी करीत भेट देण्याची मागणी केली. त्याशिवाय हे टाळे खोलणार नाही असा पवित्रा घेतला. (वार्ताहर)
निगडी प्राधिकरण कार्यालयाचे उपअभियंते गुजर हे तातडीने देहूत दाखल झाले. त्यांनी समस्या ऐकून घेत आठ दिवसांत या समस्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची ग्वाही दिली. यानंतर कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले. गुजर यांनी समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी येत्या आठवड्यात स्विचिंग स्टेशन सुरू करू. त्याचप्रमाणे वीज बिले वेळेवर व अचूक रिडिंग घेऊन वेळेत वाटप करण्यासंदर्भात संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. येथील कनिष्ठ अभियंता मोहनन यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.

Web Title: Twelve hours of electricity gul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.