बारा जातपंचायती बरखास्त
By Admin | Published: March 22, 2016 04:13 AM2016-03-22T04:13:19+5:302016-03-22T04:13:19+5:30
येथील भटके जोशी समाजाने जातपंचायत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने राज्यातील बारावी जातपंचायत बरखास्त झाली आहे.
नाशिक : येथील भटके जोशी समाजाने जातपंचायत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने राज्यातील बारावी जातपंचायत बरखास्त झाली आहे. मात्र मनमानी कारभार करणाऱ्या हजारो जातपंचायती अद्यापही राज्यात कार्यरत असल्याचा अंदाज आहे.
तीन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाहाचा राग मनात ठेवून पित्यानेच आपल्या नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीचा खून केल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. जातपंचायतीच्या दबावातून ही हत्या झाल्याचे समोर आले आणि त्यातून जातपंचायतींचा निर्दयी कारभारही उजेडात आला. अंनिसचे संस्थापक दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अनिष्ट जातपंचायतींच्या विरोधात लढा उभारला.
आॅगस्ट २०१३ मध्ये नाशिकमध्ये जातपंचायत मूठमाती परिषद झाली. त्यानंतर येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी हा लढा सुरू ठेवला. आतापर्यंत राज्यातील बारा जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत.
अहमदनगरच्या मढी व माळेगाव येथे जातपंचायतींची केंद्रे होती. तेथे शेकडो जातपंचायती भरत आणि त्यासाठी हजारो लोक जमत, मात्र प्रबोधनामुळे दोन वर्षांपासून दोन्ही ठिकाणी एकही जातपंचायत भरलेली नाही. (प्रतिनिधी)