सव्वा कोटींचे दागिने विमानतळावरून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:18 AM2017-07-24T05:18:38+5:302017-07-24T05:18:38+5:30
सिंगापूरहून बेकायदेशीरपणे सोन्याच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने मुंबई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सिंगापूरहून बेकायदेशीरपणे सोन्याच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करत चार किलो सोन्याची चेन व कडे जप्त केले. सन्तेलचमी सुपरमनियम (४१) व मॅगीसवरी जैरमन ( ५९) अशी त्यांची नावे असून दागिन्यांची किंमत १ कोटी २० लाख रुपये आहे. सन्तेलचमी ही मलेशियाची तर जैरमन ही सिंगापूरची नागरिक आहे. दोघींनी कमरेला व हाताच्या कोपरामध्ये गुंडाळून दागिने घेवून आल्या होत्या, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सिंगापूरहून जेट एअरवेज विमानाने दुपारी तीन वाजता या महिला आल्या होत्या. त्यांनी आपल्या कमरेला सोन्याचे चेन व हाताच्या कोपऱ्यामध्ये कडे लपविले होते. त्यामुळे विमानतळावरील तपासणीमध्ये ते आढळून आले नाही. मात्र एका महिला अधिकाऱ्याला त्यांच्या हालचालीबाबत संशय आल्याने त्यांची चेजिंग रुममध्ये नेवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी लपविलेले दागिने आढळून आले. दोघींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.