सव्वा लाख लीटर डिझेलचे ‘मातेरे’
By admin | Published: September 14, 2014 01:04 AM2014-09-14T01:04:23+5:302014-09-14T01:04:23+5:30
चालक-वाहकांना डिझेल बचतीचे ज्ञानामृत पाजणाऱ्या एसटी महामंडळाकडून वर्षाकाठी १ लाख २८ हजार लीटर डिझेलचे मातेरे केले जात आहे. ‘डॉकिंग’साठी (एसटीच्या चाकाच्या बुशची स्वच्छता) सर्रास महागडे डिझेल
‘डॉकिंग’साठी सर्रास वापर : रॉकेल मिळविण्यासाठी प्रयत्नच नाही
विलास गावंडे - यवतमाळ
चालक-वाहकांना डिझेल बचतीचे ज्ञानामृत पाजणाऱ्या एसटी महामंडळाकडून वर्षाकाठी १ लाख २८ हजार लीटर डिझेलचे मातेरे केले जात आहे. ‘डॉकिंग’साठी (एसटीच्या चाकाच्या बुशची स्वच्छता) सर्रास महागडे डिझेल वापरले जात असल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागत आहे.
एसटीच्या समोरील चाकाचे दोनही हब काढून त्यातील बेअरिंग स्वच्छ करण्यासाठी रॉकेलचा वापर करावा, असे एसटी महामंडळाचे संकेत आहे. मात्र गेली पाच-सहा वर्षांपासून या कामासाठी चक्क डिझेलचा वापर केला जात आहे. बसचे हब तीन महिन्यातून एकदा स्वच्छ करावे लागते. एकावेळी किमान दोन लीटर डिझेल लागते. राज्यात धावणाऱ्या १६ हजार बसेसच्या कामासाठी तीन महिन्यात ३२ हजार लीटर डिझेलचा वापर होतो. वर्षभरात या कामासाठी एक लाख २८ हजार डिझेल वापरले जाते.
आज डिझेलचा दर प्रती लिटर ६५ ते ७० रुपये एवढा आहे. अर्थात एका बसचे हब स्वच्छ करण्यासाठी १३० ते १४० रुपयांपर्यंतचा खर्च येतो. रॉकेलने हब स्वच्छ केल्यास हाच खर्च केवळ ४० रुपयात (दोन लीटर रॉकेल) भागविला जाऊ शकतो. ६५ रुपये लीटरच्या डिझेलपेक्षा २० रुपये लिटरचे रॉकेल वापरल्यास एका बसमागे ८० रुपयांची बचत होऊ शकते.
मात्र संचालकांच्या उदासीनतेमुळे महामंडळाचा वर्षासाठी ९० लाख रुपयांचा चुराडा होत आहे. रॉकेल वापरातून महामंडळाच्या खर्चात बचतीची मोठी संधी असतानाही संचालक मंडळाकडून गांभीर्याने प्रयत्न होत नाही.
शासनाकडून सवलतीच्या दरातील रॉकेल मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी तहसीलदारांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही झाली होती. मात्र माशी कुठे शिंकली हे कळायला मार्ग नाही. ‘डॉकिंग’साठी ज्या बसचे काम करायचे आहे, त्यातीलच डिझेल वापरले जाते. या प्रकारात संबंधित बसचा अॅव्हरेज कमी मिळतो. या प्रकाराला चालकास जबाबदार धरले जाते.