व्योमेशसह चौघांना १२ पर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: February 11, 2016 03:41 AM2016-02-11T03:41:53+5:302016-02-11T03:41:53+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी अटक करण्यात आलेले मुंबईतील हब टाऊन रिअॅल्टीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय सं
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी अटक करण्यात आलेले मुंबईतील हब टाऊन रिअॅल्टीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्योमेश शहा यांच्यासह चौघांची न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, या घोटाळ्यात लवकर काही बड्या राजकीय नेत्यांची नावे समोर येतील, असा दावा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केला. शहा यांच्यासह या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदमचा उजवा हात विलास भांडारकर तसेच किरण कॉन्ट्रॅक्टर व सुहास डुंबरे यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सोमवारी सायंकाळी अटक केली होती. रमेश कदमने कोमराल कंपनीचा पेडर रोडवरील ८ हजार चौरस फूट भूखंडासह ही कंपनी विकत घेतली होती. त्यासाठी महामंडळाचे १०६ कोटी रुपये वळविले होते, असे सीआयडीचे म्हणणे आहे. या प्रकरणातच चौघांना अटक झाली आहे. दरम्यान, राज्यमंत्री कांबळे यांनी सांगितले की, या घोटाळ्यात सीआयडीच्या हाती आलेल्या पुराव्याची जुळवाजुळव सुरू असून, येत्या चार-पाच दिवसांत घोटाळ्यातील राजकीय नेत्यांची नावे पुढे येतील. आरोप निश्चित झाल्यानंतर कितीही मोठी व्यक्ती असली तरी कारवाई केली जाईल. (विशेष प्रतिनिधी)
कारवाई करणार - दिलीप कांबळे
या घोटाळ्यात सीआयडीच्या हाती आलेल्या पुराव्याची जुळवाजुळव सुरू असून, येत्या चार-पाच दिवसांत घोटाळ्यातील राजकीय नेत्यांची नावे पुढे येतील. आरोप निश्चित झाल्यानंतर कितीही मोठी व्यक्ती असली तरी कारवाई केली जाईल.