सत्तावीस किलोमीटर धावून जुळल्या रेशीमगाठी !

By admin | Published: February 4, 2017 12:49 AM2017-02-04T00:49:01+5:302017-02-04T00:49:01+5:30

आगळावेगळा सोहळा : मेढा ते सातारा दरम्यान ठिकठिकाणी नवनाथ अन् पूनम यांचे स्वागत; वऱ्हाडीही धावले

Twenty-seven-kilometer rocket match! | सत्तावीस किलोमीटर धावून जुळल्या रेशीमगाठी !

सत्तावीस किलोमीटर धावून जुळल्या रेशीमगाठी !

Next

मेढा : घरातून पळून जाऊन लग्न करणारी जोडपी आजपर्यंत जगानं खूप बघितली, परंतु घरापासून २७ किलोमीटर पळत जाऊन लग्न करणाऱ्या अवलिया दाम्पत्याच्या अनोख्या प्रयोगाला सातारकरांनी सलाम केला.
लग्न सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच घडतो. तो कायमस्वरूपी लक्षात राहावा म्हणून प्रत्येकाची धडपड असते. यामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्राचीही छाप उमटते. असाच आगळावेगळा विवाह सोहळा शुक्रवारी साताऱ्यात पार पडला. जावळी तालुक्यातील काळोशीतील धावपटू नवनाथ डिगे व पूनम चिकणे हे २७ किलोमीटर धावत जाऊन रेशीमगाठीत अडकले.
सध्याच्या युगात प्रत्येकजण घड्याळाच्या काट्याबरोबर धावत आहे. परंतु यामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हेच धावणे शरीरासाठी आरोग्यपूर्ण होऊ शकते, हा संदेश देत हिल मॅरेथॉन असोसिएशनचे सदस्य नवनाथ जोतिबा डिगे यांनी पूनम रघुनाथ चिकणे हिच्या समवेत मेढा ते सातारा धावत येऊन साताऱ्यातील विवाह
नोंदणी कार्यालयात लग्न केले.
यावेळी नवनाथ व पूनम यांच्या समवेत जिल्हा हिल मॅरेथॉनचे डॉ. सुधीर पवार, अ‍ॅड. कमलेश पिसाळ, विठ्ठल जाधव, डॉ. प्रतापराव गोळे यांच्यासह उपस्थित वऱ्हाडीही धावले. यामध्ये करंजेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही समावेश होता. नववधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी मेढा-सातारा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.
नवनाथ डिगे हे अनेक वर्षांपूर्वी धावत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते दररोज पाच किलोमीटर धावतात. त्यांनी आत्तापर्यंत २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत दहा वेळा सहभाग घेतला. तर मुंबईत नुकत्याच झालेल्या ४२ किलोमीटर स्पर्धेचे अंतरही त्यांनी पार केले होते. त्यांचा विवाह जावळी तालुक्यातीलच गांजे लिगाडेवाडी येथील पूनम रघुनाथ चिकणे हिच्याशी ठरला.
‘माझे लग्न वधूबरोबर धावत जाऊन करायचे आहे,’ असा निर्धार नवनाथ यांनी केला. हा निर्धार त्यांनी घरी बोलून दाखविल्यावर घरातूनच प्रथम विरोध झाला. शेवटी अनेक मार्गांनी पटवून देण्यात ते यशस्वी झाले. यासाठी मेढ्यातील डॉ. सुधीर पवार यांनी पुढाकार घेतला.
सर्वानुमते शुक्रवार, दि. ३ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचे ठरले. त्यानुसार मेढा ते सातारा हे २७ किलोमीटर अंतर धावत पार करण्यसाठी लागणाऱ्या वेळेचे नियोजन करण्यात आले. दोघांनीनी पहाटे सहा वाजता साताऱ्याच्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. यावेळी वधू-वरासमवेत हिल मॅरेथॉनचे पदाधिकारी, वऱ्हाडीही होते.
मेढ्यातून सहायक पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे, तहसीलदार रोहिणी आखाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वधूवरांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. तर साताऱ्यात अमित कदम, कविता जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)


शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन
पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते विवाह नोंदणी कार्यालयात गेले. यावेळी डॉ. सुचित्रा काटे, अनुराधा दिवेकर, अश्विनी देव, चंद्रकांत घोरपडे, दीपक बनकर उपस्थित होते.


त्याच्यासाठी ‘ती’ही धावली...
नवनाथ डिगे व पूनम यांचा साखरपुडा ११ डिसेंबर, २०१६ रोजी झाला. त्यावेळी विवाह धावत जाऊन करण्याचा मनोदय नवनाथ यांनी बोलून दाखविला. या संकल्पनेला साऱ्यांनीच प्रतिसाद दिला. नवनाथ यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतल्याने त्यांचा दररोजचा पाच किलोमीटर धावण्याचा सराव होता.
मात्र पूनम हिने साखरपुड्यानंतर दररोज २ ते ३ किलोमीटर धावण्याचा सराव सुरू केला. साखरपुड्यानंतर पूनमने गांजे या डोंगरकपारीच्या गावातील शेतात रानात, बांधावरुन धावण्याचा सराव केला. ज्याच्याबरोबर आयुष्याची साथ आहे. त्याच्या साथीने धावण्याचा संकल्प सोडून ‘हम साथ साथ है’ हे आपल्या कृतीतून तिने दाखवून दिले.


सातारा हिल मॅरेथॉनमधून प्रेरणा
मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने नवनाथ यांचा जिल्हा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क आला. त्यातून डॉ. सुधीर पवार, डॉ. कमलेश पिसाळ यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे नवनाथ डिगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
 

Web Title: Twenty-seven-kilometer rocket match!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.