सत्तावीस हजार बालकांना डोस
By admin | Published: April 4, 2017 01:58 AM2017-04-04T01:58:54+5:302017-04-04T01:58:54+5:30
मावळ तालुक्यामध्ये २९५ बूथवर २७ हजार ८ बालकांना पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत डोस देण्यात आला.
वडगाव मावळ : मावळ तालुक्यामध्ये २९५ बूथवर २७ हजार ८ बालकांना पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत डोस देण्यात आला. लसीकरणाचे ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
लसीकरण शिबिराची सुरुवात येथील पंचायत समितीत आमदार संजय भेगडे यांच्या हस्ते तर सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अविनाश बवरे, गटविकास अधिकारी नीलेश काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, लायन्स क्लबचे कुपोषणमुक्त पुणे जिल्ह्याचे प्रांत प्रमुख भूषण मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
अंगणवाडी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, टोल नाके, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अशा २९५ ठिकाणी सकाळी ८ ते सायं. ५पर्यंत बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, महिला मंडळे, बचत गट, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोहारे, विस्तार अधिकारी सुधाकर म्हंकाळे, आरोग्य सुपरवायझर हरिष शेलार व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. (वार्ताहर)
>पवनानगर परिसरात ३४५० बालकांना लसीकरण
पवनानगर : येथे विशेष पोलिओ मोहिमेंतर्गत ३४५० मुलांना पोलिओ डोस पाजण्यात आले. रविवारी सकाळी पुणे जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले यांच्या हस्ते लोहगड येथील बूथवर लहान मुलाला पोलिओ डोस पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
येळसे येथील आरोग्य केंद्रावर सरपंच शिवाजी सुतार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेसाठी पवनानगर व परिसरामध्ये ५४ बूथ, दोन मोबाइल बूथ व ट्राझीस्ट टीम तयार करण्यात आली होती. यासाठी एकूण १२८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, अशी माहिती अरोग्य अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांनी दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्या धानिवले, येळसेचे सरपंच सुतार, उपसरपंच नवनाथ ठाकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गेंगजे, लोहगड सोसायटीचे अध्यक्ष गणेश धानिवले आदी उपस्थित होते. धानिवल्या म्हणाल्या की, येळसे प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या सर्व टीमने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. ९८ टक्के लाभार्थींना या मोहिमेचा फायदा झाला.
>देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वैद्यकीय विभागामार्फत रविवारी देहूरोड परिसरातील विविध भागांत ५५३० पैकी ३२६५ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. २२ केंद्रांसह तीन फिरत्या अशा एकूण २५ केंद्रांवर सोय करण्यात आली होती. पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी पुढील तीन दिवसांत घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार असल्याचे बोर्डाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. एम. वाकचौरे यांनी सांगितले.
देहूरोडमधील पाच वर्षाखालील ५५३० बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. रविवारी सकाळी बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात बालकांना डोस देऊन मोहिमेचे उद्घाटन आरोग्य समिती अध्यक्षा सारिका नाईकनवरे, डॉ. वाकचौरे, पी. के. वेळापुरे यांनी बालकांना डोस पाजून केले. शेलारवाडीत सदस्य रघुवीर शेलार यांच्या हस्ते ङोस पाजून उद्घाटन करण्यात आले.
रविवारी पोलिओ डोसपासून वंचित राहिलेल्या बालकांना बोर्डाच्या कर्मचारी वर्गामार्फत सोमवार, मंगळवार व बुधवारी परिसरातील घरोघरी जाऊन डोस देण्याचे नियोजन करण्यात आले. या मोहिमेसाठी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांसह, ४० अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच राज्य सरकारी रुग्णालयातील २०, विद्यार्थी व परिचारिकांचे सहकार्य घेण्यात आले. (वार्ताहर)