दोन महिन्यांच्या मुलीला हृदयविकाराचे २० झटके
By admin | Published: March 3, 2016 04:27 AM2016-03-03T04:27:34+5:302016-03-03T04:27:34+5:30
सोलापूरमधील बार्शीमध्ये राहणाऱ्या एका चिमुकलीवर एका दुर्मिळ हृदयरोगासाठी (अॅनोमालस लेफ्ट कॉर्नरी आर्टरी फ्रॉम पल्मनरी आॅर्टरी-अल्कापा) करण्यात आलेली शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे
मुंबई : सोलापूरमधील बार्शीमध्ये राहणाऱ्या एका चिमुकलीवर एका दुर्मिळ हृदयरोगासाठी (अॅनोमालस लेफ्ट कॉर्नरी आर्टरी फ्रॉम पल्मनरी आॅर्टरी-अल्कापा) करण्यात आलेली शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे. बार्शी मधून मुंबईमध्ये उपचारांसाठी येईपर्यंत तिला तब्बल २० झटके आले. तरीही मुंबईत केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. पुढच्या काहीच दिवसांत तिला डिस्चार्ज देण्यात येणार असून तिला पुढे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
गिलबिले दाम्पत्याची मुलगी आदिती २ महिन्यांची होऊनही तिचे वजन कमी होत होते. ती सतत रडायची, तिला मधेच घाम फुटायचा व दूधही पित नसे. घटणारे वजन आणि रडण्याचे कारण काय? हे जाणून घेण्यासाठी गिलबिले यांनी अदितीला बार्शीच्या डॉ. चंद्रकांत मोरे यांच्याकडे नेले. अदितीची तपासणी केल्यावर डॉक्टरांना लक्षणे पाहून दुर्मिळ हृदयविकार असू शकतो, अशी शंका आली.
बार्शीला उपचार करणे शक्य नसल्यामुळे अदितीला पुण्याच्या रुग्णालयात नेण्यात आले. उपचारासाठी लाखो रुपये लागतील. पण, त्यानंतरही शस्त्रक्रिया यशस्वी होईलच असे नाही, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. लाखो रुपये खर्च करणे शक्य नसल्यामुळे १८ फेब्रुवारीला मुंबईच्या सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाततिला दाखल करण्यात आले.
अदितीला रुग्णालयात आणले तेव्हा श्वासाचा वेग वाढलेला होता, ती दूध पित नव्हती. ती सतत रडत होती. अशा अवस्थेत अदितीच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर तिला हृद्यविकार असल्याचे स्पष्ट झाले. पण, नक्की कोणता आजार आहे? हे शोधण्यासाठी तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी अदितीला ‘अल्कापा’ हा हृदयाचा दुर्मिळ आजार झाल्याचे निष्पन्न झाले. लहान मुलांच्या हृदयाच्या धमण्या, रोहिणी १ मिलीमीटरपेक्षाही लहान आकाराच्या असतात. अशावेळी शस्त्रक्रिया करणे, जिकिरीचे होते. पण, तिच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया होणे आवश्यक होते. त्यामुळे डॉक्टरांनी २२ फेब्रुवारीला शस्त्रक्रिया केली. तब्बल ९ तास शस्त्रक्रिया सुरु होती, असे रुग्णालयाच्या बाल हृदयविकार विभागाचे मुख्य सर्जन आणि विभागप्रमुख डॉ. शिवप्रकाश यांनी सांगितले.