शाळेत पुन्हा ‘किलबिलाट’
By admin | Published: June 16, 2017 01:14 AM2017-06-16T01:14:14+5:302017-06-16T01:14:14+5:30
उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिलाट गुरुवारी पुन्हा एकदा सुरू झाला. शहर-उपनगरात सकाळपासून शाळेच्या पहिल्या दिवशी पालक आणि पाल्यांची गर्दी पाहायला मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिलाट गुरुवारी पुन्हा एकदा सुरू झाला. शहर-उपनगरात सकाळपासून शाळेच्या पहिल्या दिवशी पालक आणि पाल्यांची गर्दी पाहायला मिळाली.
लहानग्यांमध्ये काहींना शाळा प्रिय आहे तर काहींना शाळेची कटकट नकोशी वाटते. मुलांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी काही शाळांनी चिमुरड्यांचे मिरवणुकीसह गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अनेक शाळांमध्ये मुलांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. पहिल्याच दिवशी अभ्यासाचा पाठ शिकवण्यापेक्षा शाळेत गप्पागोष्टी, गीतगायन, खेळ आणि मनोरंजनाचे उपक्रम पार पडले. नवे दप्तर, नवे मित्र, नवा परिसर अगदी नव्या वातावरणात चिमुकल्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी काहीसे हसत, काहीसे रडत प्रवेश केला.
मामाच्या गावाहून परत आलेल्या काही जणांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी जाण्याचा कंटाळा केला. त्यामुळे प्ले ग्रूप, नर्सरीपासून ते चौथीच्या वर्गापर्यंत संख्या कमी राहिली. पहिल्याच दिवशी काहींच्या चेहऱ्यावर उत्साह होता तर काही विद्यार्थी कंटाळवाणे दिसत होते. शाळेत गेल्यानंतर मात्र विद्यार्थी मित्र कंपनीत रमले.