राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 05:33 PM2024-02-03T17:33:06+5:302024-02-03T17:35:12+5:30

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करत राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी नवं नाव सुचवलं आहे. 

Twist in Rajya Sabha elections Sanjay Raut suggested a new name to all party leaders for the sixth seat | राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव

राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव

Sanjay Raut On Rajya Sabha Election 2024 ( Marathi News ) : देशभरात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणूक आयोगाकडून नुकतीच निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या या ५६ जागांपैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत कोणत्या जागेवर कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करत राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी थेट शाहू छत्रपती यांचं नाव सुचवलं आहे. 

संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट लिहिती म्हटलं आहे की, "राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून ३० मते वेगळी आहेत, इतरही येतील," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच या पोस्टमध्ये राऊत यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही टॅग केलं आहे. राऊत यांनी शाहू छत्रपती यांचं नाव सुचवल्याने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून या आवाहनाला कसा प्रतिसाद दिला जातो, हे पाहावं लागेल. 

दरम्यान, सध्याच्या संख्याबळानुसार, भाजपला तीन, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक अशा पाच जागा महायुतीला, तर एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. मविआला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी १५ मतांची गरज असेल, तर भाजपला चौथी जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मदत लागेल. स्वतःची चौथी आणि महायुतीची सहावी जागा जिंकण्यासाठी भाजपला मेहनत घ्यावी लागेल. मविआत फूट पाडून काही मते वळवल्यास ते भाजपचे मोठे धक्कातंत्र ठरणार आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या सहा खासदारांचा कार्यकाळ संपणार?

- कुमार केतकर, काँग्रेस
- वंदना चव्हाण, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
- प्रकाश जावडेकर, भाजप
- मुरलीधरन, भाजप
- नारायण राणे, भाजप
- अनिल देसाई (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल

भाजपा : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०,  काँग्रेस : ४५, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्टवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ति प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ति, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३... एकूण २८७

दरम्यान, राज्यसभेसाठी ज्या १५ राज्यांत राज्यसभा निवडणुका होणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. 
 

Web Title: Twist in Rajya Sabha elections Sanjay Raut suggested a new name to all party leaders for the sixth seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.