महाराष्ट्राच्या राजकारणातला 'तो' ट्विस्ट ! अन् " भेट तुझी-माझी स्मरते.."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 11:21 AM2020-10-04T11:21:09+5:302020-10-04T11:37:22+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बंद दरवाजाआड तब्बल 2 तास चर्चा झाली.. अन् पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं.. !
कविवर्य मंगेश पाडगावकर आणि संगीतकार यशवंत देव यांची माफी मागून सादर करत आहे अशाच एका अविस्मरणीय भेटीचे द्वंद्वगीत...
‘कमला’कांत
भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची
धुंद वादळाची, मात्र छुप्या संकेताची ।।ध्रु।।
कुठे खबर नव्हती, बातमीदारांना गुंगारा
‘घड्याळ’ बंद, ‘दादां’ना लागू दिला न वारा
तमात खलबते, साक्ष ‘ग्रँड हयात पंचतारा’
तुझ्या करामतीस नव्हती बाधा ‘बारामती’ची
सत्तेत राहुनही तुला जुनी सवय विरोधाची
भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची
धुंद वादळाची, मात्र छुप्या संकेताची..!
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
‘महाविकास’ टाकून आली अशी तुझी प्रीती
मुलाखतीआधीच किती तयारी मुलाखतीची
तुला मुळी जाणीव होती, तुझ्या साहसाची
‘घड्याळा’च्या गजराची, जखडणाºया ‘पंजा’ची
भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची
धुंद वादळाची, मात्र छुप्या संकेताची
-------------------------
'सामना'वीर सैनिक
भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची
धुंद वादळाची, मात्र छुप्या संकेताची ।।ध्रु।।
‘धनुष्यबाणा’ने ओरखडले ‘कमले’च्या गाली
जखम ती ओली अजुनि भरोनि ना आली
ओठांवर वेदना तिनेहीे येऊनि ना दिली
‘सामना’त मी लिहिणार गाथा मुलाखतीची
आमच्या रुसव्या-फुगव्याची, उत्कट प्रीतीची
भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची
धुंद वादळाची, मात्र छुप्या संकेताची..!
-------------------------
‘पहाटेच्या हळव्या शपथा’, विसरतोय खास
स्वप्नातले दु:स्वप्न असावे, असे सर्व भास
आता आणू नका अडथळे ‘आदित्य’उदयास
‘नव्या मित्रांना’ही भोवळ आली
पाहोनि भेट ‘जुन्या मित्रांची’
भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची
धुंद वादळाची, मात्र छुप्या संकेताची
-------------------------
सुगंधित भेट गंध राजभवनी जाई
‘महामहिमां’ची निद्रा अवघी हिरावून नेई
पहाटे उरकोनि अन्हिके ते तयारीत राही
कानी त्यांच्या गुंजती आवर्तने
‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’ मंत्राची
भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची
धुंद वादळाची, मात्र छु्प्या संकेताची...
- अभय नरहर जोशी
(लेखक 'लोकमत'च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)