12 आमदारांबाबतचा निकाल अन् नियुक्तीवरून उर्मिला मातोंडकर व भाजप यांच्यात सोशल मीडियावर रंगला कलगीतुरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 05:36 PM2022-01-28T17:36:04+5:302022-01-28T17:43:21+5:30

Maharashtra MLA Suspension : न्यायालयाच्या निर्णयावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधाला आहे. याला शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Twitter war between Keshav Upadhyay and Urmila Matondkar on Supreme Court cancels suspension of 12 Maharashtra BJP MLAs | 12 आमदारांबाबतचा निकाल अन् नियुक्तीवरून उर्मिला मातोंडकर व भाजप यांच्यात सोशल मीडियावर रंगला कलगीतुरा!

12 आमदारांबाबतचा निकाल अन् नियुक्तीवरून उर्मिला मातोंडकर व भाजप यांच्यात सोशल मीडियावर रंगला कलगीतुरा!

googlenewsNext

मुंबई : भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याविरोधात भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधाला आहे. याला शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, यावरून उर्मिला मातोंडकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात ट्विटरवर जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे.

यासंदर्भात उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट केले आहे. "अभिनंदन! आनंद आहे 'लोकशाही' वाचली याचा...पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त 50 लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम 12 करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे", असे ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. 

केशव उपाध्येंचा उर्मिला मातोंडकरांना टोला
उर्मिला मातोंडकर यांच्या ट्विटला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे. ‘थोडी माहिती घ्या आपलं वाचन चांगलं आहे असं ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. आमदारांना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदाकीचा विषय तर त्यासाठी लोकं न्यायालयात गेली होती, पण न्यायालयाने काही सांगितलं नाही’, असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मविआ सरकारच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड लगावली आहे. तसे तर संसदीय कामात न्यायालयीन हस्तक्षेप नसतो. पण, जेव्हा लोकशाहीची पायमल्ली होते, तेव्हा संविधानाचे रक्षण न्यायालयालाच करावे लागते. आता सरकारने या 12 मतदारसंघातील जनतेची माफी मागितली पाहिजे, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

50 लाखांहून अधिक मतदारांचा प्रश्न
हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपाच्या 12 आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले, हे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. आज सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले. हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिली. 

या आमदारांचे निलंबन मागे
न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी, न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेवरील सर्व युक्तिवाद गेल्या आठवड्यात संपले. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. यानंतर भाजपच्या आशिष शेलार (वांद्रे पश्चिम),अभिमन्यू पवार (औसा),गिरीश महाजन (जामनेर),पराग अळवणी (विलेपार्ले),अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व),संजय कुटे (जामोद, जळगाव),योगेश सागर (चारकोप),हरीश पिंपळे (मूर्तीजापूर),जयकुमार रावल (सिंधखेड),राम सातपुते (माळशिरस),नारायण कुचे (बदनपूर, जालना),बंटी भांगडिया (चिमूर) या आमदारांचे निलंबन मागे घेतले आहे.

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?
गेल्या वर्षी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर विधानसभेत चर्चा सुरू असताना राजदंड उचलणं, माईक खेचणं, त्याचबरोबर अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की करणं, शिवीगाळ करणं, अपशब्द वापरून गैरवर्तन करणं, यासाठी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. याविरोधात भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

Web Title: Twitter war between Keshav Upadhyay and Urmila Matondkar on Supreme Court cancels suspension of 12 Maharashtra BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.