खिद्रापुरेच्या दोन एजंटांना अटक

By admin | Published: March 10, 2017 11:23 PM2017-03-10T23:23:51+5:302017-03-10T23:23:51+5:30

म्हैसाळ भ्रूणहत्याकांड; आणखी दोघे ताब्यात; पत्नीची कसून चौकशी, महिला डॉक्टरही रडारवर

Two agents of Khidrpure are arrested | खिद्रापुरेच्या दोन एजंटांना अटक

खिद्रापुरेच्या दोन एजंटांना अटक

Next

मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्याकडे लिंगनिदान व गर्भपातासाठी रुग्ण आणणाऱ्या दोघा एजंटांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
सातगोंड कलगोंड पाटील (वय ६२, रा. कागवाड), यासिन हुसेन तहसीलदार (वय ६०, रा. तेरवाड) अशी त्यांची नावे असून, त्यांना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी दिली. खिद्रापुरेची डॉक्टर पत्नी डॉ. मनीषा हिची अद्याप पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी कर्नाटकातील एक महिला डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर आहे.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा म्हैसाळ येथे अनैसर्गिक गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यानंतर भ्रूणहत्याकांड उघडकीस आले. म्हैसाळ येथे पुरलेले १९ भ्रूण सापडल्यानंतर भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. खिद्रापुरे याला अटक करण्यात आली. कर्नाटकातील कागवाड, विजापूरसह आणखी काही ठिकाणी गर्भलिंग चाचणी करून तो म्हैसाळ येथे गर्भपात करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करून चार सोनोग्राफी यंत्रे ताब्यात घेतली आहेत. सातगोंड पाटील व यासिन तहसीलदार हे दोघे एजंट कर्नाटकात गर्भलिंग चाचणी करून डॉ. खिद्रापुरे याच्याकडे गर्भपातासाठी महिला रूग्ण आणत असल्याचे कागवाड येथील डॉ. श्रीहरी घोडके याच्या चौकशीत निष्पन्न झाल्याने दोघांना अटक करण्यात आली.
आणखी दोन एजंटांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. डॉ. खिद्रापुरेची पत्नी डॉ. मनिषा हिची पोलिसांकडून अद्याप चौकशी सुरू आहे. तिच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
म्हैसाळ येथील गर्भलिंग निदान व गर्भपातप्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून डॉ. खिद्रापुरे यास गर्भलिंग निदान व गर्भपातासाठी मदत करणारे दोन डॉक्टर, परिचारिका, औषध पुरवठादार, दोन एजंट अशा सातजणांना पोलिसांनी अटक केली असून, आणखी काही जणांवर याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार आहे. याप्रकरणी कर्नाटकातील एक महिला डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजले.
डॉ. खिद्रापुरे याच्या म्हैसाळमधील भारती रुग्णालयाची खा. संजय पाटील, भाजपचे नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी शुक्रवारी पाहणी करून पोलिसांच्या तपासाबाबत माहिती घेतली. (वार्ताहर)
कर्नाटकातील बोगस डॉक्टरांचे पलायन
डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या भ्रूणहत्या रॅकेटचे कर्नाटकातील कनेक्शन पोलिसांनी उघडकीस आणले आहे. मात्र कर्नाटकातील पोलिस व आरोग्य विभागाच्या यंत्रणेने या प्रकरणाची अद्याप दखल घेतलेली नाही. कर्नाटकात कागवाड, विजापूरसह आणखी काही गावात बोगस डॉक्टरांकडून गर्भलिंग निदान चाचणी करण्यात येत आहे. सांगली पोलिसांच्या कारवाईमुळे कर्नाटकातील बोगस डॉक्टरांची धावपळ उडाली असून अनेकांनी पलायन केले आहे.


पालकमंत्री आज सांगलीत
म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणाने शासकीय यंत्रणा हादरून गेली असून मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची सांगलीकडे रीघ लागली आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आज, शनिवारी सांगलीत येत
असून सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणाचा आढावा घेणार आहेत.



चौकशीसाठी नव्याने वैद्यकीय समिती
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी शासनस्तरावर नव्याने वैद्यकीय समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भातील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात भ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस येताच आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी अवैध गर्भपाताची चौकशी करण्यासाठी तातडीने वैद्यकीय समिती स्थापन केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सावंत, बेळंकीचे वैद्यकीय अधिकारी विजय जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी या पाचजणांचा समितीमध्ये समावेश आहे. समितीने पोलिसांना तांत्रिक मुद्यावर तपासात मदत केली. खिद्रापुरेच्या रुग्णालयात जाऊन चौकशी केली. चौकशीचा अहवाल त्यांनी सादर केला आहे.
समितीमधील काही सदस्यांवर आरोप होत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही या भ्रूणहत्येमागे सांगलीतील आरोग्य विभाग दोषी असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. त्यामुळे शासनस्तरावर नव्याने वैद्यकीय समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. नवीन समितीमध्ये बाहेरील जिल्'ातील वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील संचालकांना घेतले जाणार आहे. ही समिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी सादर केलेल्या अहवालातील मुद्दे तपासणार आहे. याशिवाय ते नव्याने चौकशी करणार आहेत. (प्रतिनिधी)

म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणात प्रशासनाचा हलगर्जीपणा
संजयकाका पाटील; दोषींवर आठ दिवसांत कारवाई
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथे घडलेले भ्रूणहत्याकांड जिल्ह्याला काळिमा फासणारे आहे. भ्रूणहत्येबाबत केंद्राने कठोर कायदे केले आहेत, पण या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सखोल चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून, येत्या आठ दिवसांत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे खासदार संजयकाका पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.
खासदार पाटील यांनी म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या भारती रुग्णालयाला भेट देऊन पोलिस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, म्हैसाळच्या भ्रूणहत्याकांडाने जिल्ह्याचे नाव बदनाम झाले. ही घटना माणुसकीला कलंकित करणारी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनाही संपूर्ण घटनेची माहिती दिली असून, दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. भाजपचे आमदार व आपण स्वत: या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहोत.
२०१३ पासून बाबासाहेब खिद्रापुरे त्याच्या रुग्णालयात गर्भपात करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. कर्नाटकातून सोनोग्राफी करून म्हैसाळ येथे गर्भपात केला जात होता. सोनोग्राफी यंत्रचालकाला कमिशन दिले जात होते. खिद्रापुरेबाबत जिल्हा प्रशासनाकडे निनावी पत्राद्वारे तक्रारही करण्यात आली होती. पण प्रशासनाने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. केंद्र शासनाने गर्भलिंग निदानाबाबत दोन कठोर कायदे केले आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. पण त्यात हलगर्जीपणा झाल्यानेच भ्रूणहत्यांचे पातक घडले. ही भ्रूणहत्या रोखण्याची जबाबदारी, लाखो रुपये पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे. केंद्र शासनाच्या कायद्यातही काही दुरुस्तीची आवश्यकता असल्यास आपण लोकसभेत आवाज उठवू. या प्रकरणातील दोषी अधिकारी कितीही मोठ्या पदावर असला तरी, त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. खिद्रापुरे याला पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेला बाजूला ठेवून स्वतंत्र यंत्रणेमार्फत याचा तपास करण्याची मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात ही कारवाईची प्रक्रिया होईल, असेही खा.पाटील यांनी स्पष्ट केले.
विधी सल्लागार नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादाबाबत ते म्हणाले की, शासकीय समितीवरील विधी सल्लागार अर्चना उबाळे कंत्राटी पद्धतीने कार्यरत होत्या. त्यांच्याबद्दल तक्रारी आल्याने त्यांना पालकमंत्र्यांनी बाजूला केले, असे प्रशासनाने आपणास सांगितले आहे. पण त्यांना हटविल्यानंतर नव्याने नियुक्ती होण्याची गरज होती.
पालकमंत्र्यांनी अद्याप म्हैसाळला भेट दिली नसल्याचे निदर्शनास आणून देताच खा. पाटील म्हणाले की, घटना उघड होताच पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून माहिती घेतली होती. तपासाबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
केंद्रीय समितीतर्फे चौकशी
म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय स्तरावरील समितीकडून व्हावी, यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना पत्र दिले आहे. चार दिवसात आपण दिल्लीला जाणार आहोत. तेथून केंद्रीय समिती पाठवून या प्रकरणाची तपासणी करणार आहोत. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात या प्रकरणाची व्याप्ती आहे. आंतरराज्य सीमेमुळे या प्रकरणाचा तपास थंडावू नये, यासाठी केंद्रीय समितीची आवश्यकता असल्याचेही खा. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Two agents of Khidrpure are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.