Breaking; कृत्रिम पावसाच्या शास्त्रीय प्रयोगासाठी आज दोन विमाने उड्डाण घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:35 PM2019-07-29T12:35:56+5:302019-07-29T12:44:57+5:30
ढगांमध्ये कॅल्शियम क्लोराईडची फवारणी होणार; सप्टेंबरपर्यंत चालणार ही मोहिम; २५ जणांची टीम कार्यरत
सोलापूर : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेच्या (आयआयटीएम) वतीने सोमवारपासून जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या शास्त्रीय प्रयोगाला सुरुवात होत आहे. होटगी रोडवरील विमानळावरुन पहिले विमान ढगांमध्ये अवलोकन करण्यासाठी तर दुसरे विमान त्या ढगांमध्ये कॅल्शियम क्लोराईडची फवारणी करण्यासाठी उड्डाण घेईल. सप्टेंबर अखेरपर्यंत हा प्रयोग सुरू राहणार असल्याचे आयआयटीएमच्या प्रकल्प संचालक थारा प्रभाकरन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तारा प्रभाकरन म्हणाल्या, आयआयटीएमने २०१८ मध्ये हा प्रयोग केला होता. आता पुन्हा हा प्रयोग केला जात आहे. वर्षाव वाढीचा प्रयोग (कॅपेक्स) हा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा प्रकल्प आहे. यासाठी आयआयटीएमने केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट आणि तुळजापूर येथील तुळजाभवानी कॉलेज आॅफ इंजिनिअरींगमध्ये रडार बसविले आहेत. या रडारच्या माध्यमातून २०० किमी त्रिज्येच्या क्षेत्रात ढग आणि पावसाचे निरीक्षण केले जाते. यासाठी सोलापुरात एक सेंटर उभारण्यात आले आहे. रडारच्या माध्यमातून दर दहा मिनिटाला आयएमडीच्या वेबसाईटवर वातावरणाचा अंदाज येतो.
ढगांची स्थिती लक्षात येते. या माहितीच्या आधारे सीडिंग केले जाते. या कार्यक्रमासाठी दीर्घकालीन निरीक्षणे आणि मूल्यांकन आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
मागील वर्षी क्लाउड सीडिंग करण्यात आले. यातील ८३ प्रयोगांतून क्लाउड सीडिंगची परिपूर्ण माहिती आणि निरीक्षणे हाती आली. अनेक देशात दहा वर्षे प्रयोग केल्यानंतर कुठे ५० तर कुठे १०० निरीक्षणे हाती येतात. आयआयटीएमने सोलापूर जिल्ह्यात केलेल्या प्रयोगातून केवळ एक वर्षातच ८३ प्रयोगांची परिपूर्ण माहिती हाती आली आहे.
या प्रयोगासाठी बंगळुरू येथील क्याथी क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सलटंट कंपनीकडून दोन विशेष विमानांना क्लाउड सीडिंगसाठी आवश्यक असलेली यंत्रणा लावण्यात आली आहे. यासाठी अमेरिकी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला आहे. यातील एका विमानात पायलटसोबत आयआयटीएमच्या प्रकल्प संचालक तारा प्रभाकरन असतील. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पायलट ढगांमध्ये बीजारोपण करणार आहे. या प्रकल्पासाठी आयआयटीएमचे संशोधक डॉ. शिवसाई दीक्षित, डॉ. महेन कुंवर, डॉ. मुरुगवेल, डॉ. शुभार्थी चौधरी यांच्यासह २५ जणांचा संघ कार्यरत आहे.
अशी होते ढगांमध्ये फवारणी
- ढगांमध्ये बीजारोपणासाठी निघालेले एक विमान ढगांच्या खाली जाऊन कॅल्शियम क्लोराईडची फवारणी करते. त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला जाऊन फवारणी करते. पुन्हा त्याच्या वर जाऊन पुन्हा फवारणी केली जाते. कॅल्शियम क्लोराईडचे कण ढगांमध्ये जातात. ढगाच्या आतमध्ये जाऊन गेल्यानंतर हे कण कशापध्दतीने काम करतात, हे कण ढगांच्या आतील पाण्याच्या कणांवर कसा परिणाम करतात, हे खूप महत्त्वाचे आहे. त्यातून पाऊस पडू शकतो. कोणत्याही एका ढगाचे आयुष्यमान ३० मिनिटांचे असते. या काळातच ढगांमध्ये खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने फवारणी केली जाते. वैमानिक आपले कसब वापरुन ढगांमध्ये फवारणी करतात, असेही संशोधक शिवसाई दीक्षित यांनी सांगितले.
या प्रयोगाचे उद्दिष्ट
- उष्णकटिबंधीय ढगांची प्रक्रिया समजून घेणे, पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे कोरड्या, छाया क्षेत्रावरील क्लाउड सीडिंग प्रभावी होण्यासाठी योग्य परिस्थितीची तपासणी करणे, पाऊसमान वाढण्यासाठी वैज्ञानिक मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करणे आणि या कार्यक्रमासाठी शिफारशी करणे.