संदेसे आते है...पुण्यातून सैनिकांना जातात अडीच लाख राख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 08:51 PM2018-08-22T20:51:56+5:302018-08-22T20:52:58+5:30
घरादाराची पर्वा न करता देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी पुण्यातून काही संस्था राख्या पाठवतात. मात्र ही संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवडची मिळून अडीच लाखांच्या पुढे जाते.
पुणे : भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी
याच ओळींना स्मरत पुणे शहराने एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. घरादाराची पर्वा न करता देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी पुण्यातून काही संस्था राख्या पाठवतात. मात्र ही संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवडची मिळून अडीच लाखांच्या पुढे जाते. या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या सैनिक मित्र मंडळातर्फे ४० हजार राख्या यंदा सैनिकांना रवाना होत आहेत.
राखीपौर्णिमा म्हटलं की प्रत्येक भावाला बहिणीची आठवण येतेच. पण अनेकांना कामामुळे बहिणीला भेटता येत नाही. अशावेळी व्हिडीओ कॉल, फोन, मेसेजच्या माध्यमातून राखीपौर्णिमा साजरी केली जाते. मात्र सैनिकांना प्रत्येकवेळी बहिणीशी बोलणे शक्य होतेच असं नाही. हेच लक्षात घेऊन सैनिकांना राख्या पाठवून तुम्ही आमचे रक्षणकर्ते बांधव असल्याचा प्रेमळ संदेश त्यांना दिला जातो.अगदी देशातील दीडशे बॉर्डर पोस्टवर राख्या धाडल्या जातात. सध्या शहरातील अनेक संस्था, शाळांचा त्यात समावेश आहे. त्यासोबत अनेक विद्यार्थी चित्र काढून किंवा पत्रही पाठवतात. त्यांच्या पत्रांना अनेक सैनिक उत्तरही देतात. त्यामुळे हे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक रेजिमेंटचे सैनिक एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. तिथले पंडित त्यांना राख्या बांधतात. याबाबत सैनिक मित्र मंडळाचे आनंद सराफ यांनी लोकमतला सांगितले की, आम्हाला अनेक जण स्वतःहून राख्या आणून देतात. विविध शाळा, वृद्धश्रम, मतिमंद मुलांच्या शाळांमधूनही राख्या जमा केल्या जातात. इथून त्या पोस्टाच्याद्वारे सैनिकांना पाठवल्या जातात.या एका प्रेमाच्या धाग्याने देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानाच्या अंगात बारा हत्तीचे बळ संचारते.