दोघा हरीण तस्करांना अटक
By admin | Published: June 11, 2015 10:57 PM2015-06-11T22:57:22+5:302015-06-12T00:36:42+5:30
इस्लामपुरात कारवाई : दोन पाडसांची सुटका; विक्रीसाठी दहा लाखांचा सौदा
सांगली : रायगड जिल्ह्यातून हरणांची तस्करी करून ती सांगली जिल्ह्यात विकण्यासाठी येणाऱ्या तस्करांसह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे अटक केली. मोटारीतील हरणांची दोन पाडसे ताब्यात घेण्यात आली आहेत.
फिरोज बशीर कुडपकर (२५, रा. वारंग, ता. महाड, जि. रायगड) व संजय कृष्णा धुमाळ (३८, लाहोरी, ता. पोलादपूर, जि. रायगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. इस्लामपुरातील मध्यस्थांमार्फत या दोन हरणांचा दहा लाखाला सौदा ठरला होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे.इस्लामपुरात दोन हरणांना विकण्यासाठी रायगड जिल्ह्यातून दोन व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास पेठ-इस्लामपूर (ता. वाळवा) येथे ही गाडी थांबवून झडती घेतली, त्यावेळी मोटारीत पाठीमागे हरणांची दोन पाडसे आढळली. ही पाडसे चार महिन्यांची आहेत. संशयितांविरुद्ध हरणांची तस्करी केल्याचा गुन्हा इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हा तपास वनविभागाकडे सोपविला असून वनविभागाने संशयितांना आपल्या ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)
प्रत्येकी दहा हजारांना खरेदी
रायगड जिल्ह्याच्या मुंबोशी येथील बुवानामक व्यक्तीकडून फिरोजने ही हरणे प्रत्येकी दहा हजाराला खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही हरणांची तो इस्लामपुरातील मध्यस्थामार्फत विक्री करणार होता. गुरुवारी मध्यस्थाने त्याला बोलाविले होते. दोघांमध्ये मोबाईलवरून झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग प्र्राप्त झाले आहे. बुवा व इस्लामपुरातील मध्यस्थाचे नाव सांगण्यास नकार पोलिसांनी नकार दिला होता.वन विभागाने हरणांना ताब्यात घेतले. दुपारी त्यांना चांदोली अभयारण्यात सोडून दिले.