म्हात्रे हत्येप्रकरणी दोन जणांना अटक
By admin | Published: February 20, 2017 03:34 AM2017-02-20T03:34:57+5:302017-02-20T03:34:57+5:30
भिवंडी पालिकेतील सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची हत्या करणाऱ्यांपैकी दोन जणांना पोलिसांनी सीएसटी स्थानकातून अटक केली. त्यांना
भिवंडी : भिवंडी पालिकेतील सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची हत्या करणाऱ्यांपैकी दोन जणांना पोलिसांनी सीएसटी स्थानकातून अटक केली. त्यांना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अंजूरफाटा-ओसवालवाडी येथील समृद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारे नगरसेवक म्हात्रे यांची इमारतीखाली गेल्या मंगळवारी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शहरातील सोशल मीडियावर फिरल्याने आरोपींची नावे स्पष्ट झाली होती. तसेच म्हात्रे यांच्या चालकानेही तक्रारीत सात जणांची नावे दिली. त्यानुसार, पोलिसांचा तपास सुरू असताना त्यापैकी दोघे मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती तपास पथकास मिळाली. त्यानुसार, सापळा लावून पोलिसांनी महेश म्हात्रे व मयूर ऊर्फ कोको प्रकाश म्हात्रे यांना अटक केली. दोघेही मारेकरी कालवार गावातील राहणारे असून त्यांनी टोळीने हत्या केल्याचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. हत्येत त्यांचा सहभाग असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)