एक कोटीच्या सोने चोरीप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: June 7, 2017 05:18 AM2017-06-07T05:18:45+5:302017-06-07T05:18:45+5:30
एक कोटीची सोन्याची बिस्किटे चोरल्याप्रकरणी दुकानातील एका कर्मचाऱ्यासह दोघांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील एका सराफा दुकानातून सुमारे एक कोटीची सोन्याची बिस्किटे चोरल्याप्रकरणी दुकानातील एका कर्मचाऱ्यासह दोघांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
नौपाड्यातील गोखले रोडवरील राजावत ज्वेलर्सच्या गुप्त तिजोरीमध्ये मालक हितेन जैन यांनी प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाची ३५ सोन्याची बिस्किटे २९ मे रोजी ठेवली होती. एक कोटी एक लाख ५० हजार रुपयांची ही बिस्किटे तिजोरीतून चोरी झाल्याचे शनिवारी सायंकाळी उघडकीस आले. सोमवारी हितेन जैन यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हितेन जैन यांनी त्यांचे कर्मचारी सुरेंद्रसिंग दातारसिंग शेखावत, सफाई कामगार रोहित पारटे आणि दुकानातील इतर कामगारांवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता घटनेच्या दिवशी दुकान बंद केल्यानंतरही रोहित पारटे याच्या मोबाइल फोनचे लोकेशन दुकानाच्या जवळ दाखवत होते. या आधारे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यानेच चोरी केली असल्याची माहिती समोर आली. यामध्ये रोहितच्या मावस बहिणीचा पती सुनील सपकाळे याचाही सहभाग समोर आला असून, पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
राजावत ज्वेलर्सच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावल्यानंतर शटर ओढण्यापूर्वी चावी आतमध्ये टाकण्याची पद्धत आहे. जवळपास १0 वर्षांपासून नोकरीला असलेल्या रोहितला ही पद्धत माहीत होती. त्याने नेमका याचाच फायदा घेतला. घटनेच्या दिवशी दुकान बंद करण्याच्या वेळी तो आतमध्येच लपून राहिला. सर्व कर्मचारी निघून गेल्यानंतर त्याने सीसी कॅमेरे बंद करून तिजोरीतील सोने काढून घेतले, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून चोरीचे सोने जप्त करणे बाकी असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.