भिकाऱ्यांच्या दोन खुनातून लहरिया निर्दोष
By admin | Published: December 30, 2016 05:17 PM2016-12-30T17:17:45+5:302016-12-30T17:17:45+5:30
सीरियल किलर दिलीप कुॅँवरसिंह लहरिया (वय २७, रा. पथरिया, ता. बिलासपूर, जि. दुर्ग, छत्तीसगड) याची जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 30 - प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातील दोघा भिकाऱ्यांच्या खून खटल्यातून संशयित आरोपी सीरियल किलर दिलीप कुॅँवरसिंह लहरिया (वय २७, रा. पथरिया, ता. बिलासपूर, जि. दुर्ग, छत्तीसगड) याची जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.
रेल्वे स्थानक परिसरात मे आणि जून २०१३ मध्ये पदपथावर झोपलेल्या पाच ते सहा भिकाऱ्यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सीरियल किलर दिलीप लहरिया याला अटक केली. लहरियावर तीन खूनांचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी रेल्वे स्थानक परिसरातील दोघा भिकाऱ्यांच्या खुनाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी १२ साक्षीदार तपासले होते. या खटल्याचा शुक्रवारी अंतिम निकाल झाला. लहरियावर १९ जून २०१२ रोजी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीच्या सुभाष रोडवर दुकानाच्या दारात झोपलेली वृध्दा शकुंतला महादेव जाधव (वय ६०) हिचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याची सुनावणी ३ जानेवारीपासून सुरु होत आहे. त्यामुळे लहरिया दोन खुनाच्या गुन्ह्यांतून निर्दोष झाला असला तरी वृद्धेच्या खुनाच्या सुनावणीमुळे त्याची पुन्हा कळंबा कारागृहात रवानगी केली.
या मुद्द्यावरून झाला निर्दोष
संशयित लहरिया याचा खून करण्यामागे कोणताही हेतू नव्हता. सरकार पक्षातर्फे जे साक्षीदार तपासले ते नेहमीचे पंच आहेत. तसेच काही गुन्हेगारी रेकॉर्डवरील आहेत. लहरिया हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार झाले. त्याच्या समोर जो तपास केला गेला, त्याची जाणीव त्याला नव्हती. भिकाऱ्यांच्या खून मालिकेदरम्यान मुंबईहून पथक कोल्हापूरात आले होते. त्यामुळे आपल्यावरील डाग पसून टाकण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी घाईगडबडीने लहरियाला अटक केली. लहरियाच्या अटकेनंतर दोन महिन्यांनी शिर्डीमध्ये भिकाऱ्यांच्या खूनप्रकरणी सचिन रामदास वैष्णव या सीरियल किलरला शिर्डी पोलिसांनी अटक केली होती. त्याने चौकशीमध्ये कोल्हापुरातील भिकाऱ्यांच्या खुनाची कबुली दिली. त्याने हे खून केले नसतील कशावरुन त्यासंबधी कोल्हापूर पोलिसांनी काय चौकशी केली. लहरिया हा मनोरुग्ण आहे; त्यामुळे त्याला गुन्ह्यांत दोषी ठरविता येणार नाही. पोलिसांनी त्याला बळीचा बकरा बनविला आहे. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करावी. असा युक्तिवाद वकील अॅड. दत्तात्रय कवाळे यांनी मांडला होता.