बेछूट गोळीबारात दोघे भावंडे जखमी
By admin | Published: June 26, 2017 03:27 AM2017-06-26T03:27:43+5:302017-06-26T03:27:50+5:30
शहरातील भारत नगरासह पवन नगर भागात पोलीस दप्तरी कुविख्यात व हद्दपार असलेल्या आरोपींनी बेछूट गोळीबार केल्याने पुन्हा
गणेश वाघ/ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 26 -शहरातील भारत नगरासह पवन नगर भागात पोलीस दप्तरी कुविख्यात व हद्दपार असलेल्या आरोपींनी बेछूट गोळीबार केल्याने पुन्हा बिहारराज अवतरल्याची परिस्थिती निर्माण झाली़ या घटनेत भावंडे जखमी झाली आहेत तर गोळीबारानंतर आरोपींनी तीन दुचाकींवरून पळ काढला़
रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे़
पोलीस दप्तरी हद्दपार असलेल्या मुकेश भालेरावसह जितू भालेराव, गौरव बढे, गौतम चिल्ला व अन्य पाच जणांनी मद्यधूंद अवस्थेत तीन दुचाकींवर भारत नगरात येत गावठी कट्ट्याद्वारे हवेत तीन फैरी झाडल्या तसेच हातातील खंजर व तलवारीने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली़ भाजी विक्रेता राजेंद्र नामदेव काटकर यांच्यावर कट्टा रोखत त्यांचे कुलर तोडले तर जावेद जाफर तडवी (११) या बालकावर कट्टा रोखत हवेत तीन फैरी झाडण्यात आल्या़ गुन्हेगारांचा हा थरार पाहून या भागातील सीमा चौधरी या जागीच बेशुद्ध पडल्या़ गुन्हेगारांनी या भागातून पळ काढत पवन नगरात कृष्णा ट्रेडर्समागे उभ्या असलेल्या भावंडाशी हुज्जत घातली़ अभियंता असलेल्या निखील किशोर झांबरे (२४) यांच्या पायाला, हाताला गोळी लागली असून डोक्याला दगडफेक करण्यात आल्याने मार लागला़ त्यांना वाचवण्यासाठी भाऊ सुमीत किशोर झांबरे (२०) धावल्याने आरोपींनी त्याच्यावरही खंजरने वार केल्याने त्याच्या हाताच्या दंडासह पोटाला गंभीर दुखापत झाली़
दरम्यान, सहा़पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक वसंत मोरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली़ रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते़