मुंबईत विजय दोघा भार्इंचा
By admin | Published: December 31, 2015 12:34 AM2015-12-31T00:34:54+5:302015-12-31T00:34:54+5:30
विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत बुधवारी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत अवघ्या तीन मतांच्या फरकाने काँग्रेसचे भाई
मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत बुधवारी काँग्रेसने
बाजी मारली आहे. या निवडणुकीत अवघ्या तीन मतांच्या फरकाने काँग्रेसचे भाई जगताप विजयी
ठरले, तर शिवसेनेकडून रामदास
कदम यांनी आमदारकीची माळ गळ््यात घातली.
राष्ट्रवादीकडून प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, आधीपासूनच निवडणुक रंगत
होणार असल्याचे स्पष्ट होते.
मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी
लाड यांना मतदान केल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुपी युती पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना एकतर्फी विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केल्याने कदम यांना आश्वासक विजयावर समाधान मानावे लागले. यावर भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची प्रतिक्रिया रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे.
या आधी सकाळी पालिका मुख्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली़ अपेक्षित संख्याबळ असल्याने शिवसेनेचे रामदास कदम यांनी ८६ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र, राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या बंडखोरीने काँग्रेसचा विजय लांबला. अपेक्षित संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेसला अन्य पक्षावर अवलंबून राहणे भाग होते़ याउलट प्रस्तापित भाजपशी छुपी युती करत, राष्ट्रवादीने काँग्रेसच्या जागेवर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र काँग्रेसच्या भाई जगताप यांनी लाड यांना धुर चारली.
लाड यांनी विजयासाठी सर्व शक्तीला पणाला लावली होती़ मात्र, विजयाची खात्री असलेल्या काँग्रेसच्या पारड्यात दोन तासांनंतर ५८ आणि लाड यांच्या पारड्यात
५५ मते पडल्याचे जाहीर झाले़
भाई जगताप विजयी झाल्याचे कळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून वाजत-गाजत मिरवणूक काढली. जगताप यांची घोड्यावरून काढलेली मिरवणूक यावेळी विशेष लक्षवेधी ठरली. महापालिकेसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झेंडे
मिरवत आनंद साजरा केला. तर शिवसेनेचे रामदास कदम यांच्या पाठिराख्यांनीही घोषणा देत परिसर दणाणून सोडला. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी - भाजपची छुपी युती यावेळी उघड दिसून आली. भाजपने पुन्हा एकदा पाठीत खंजीर खुपसला आहे. मुख्यमंत्र्यांनी जागा दिली नसली, तरी मतदानही केलेले नाही. मात्र, शिवसैनिकांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा जिंकून दिले आहे.
- रामदास कदम, विजयी उमेदवार
हा तर मुख्यमंत्र्यांचा पराभव...
मुख्यमंत्र्यांना काँग्रसेचा पराभव करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. भारतीय जनता पक्ष नेहमीच सूडबुद्धीचे राजकारण करत आली आहे, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. या निवडणुकीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे.
- भाई जगताप, विजयी उमेदवार