छोटा राजनवरील दोन खटले सीबीआयकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2016 02:05 AM2016-03-15T02:05:34+5:302016-03-15T02:05:34+5:30
महाराष्ट्रात छोटा राजनवर नोंदवण्यात आलेल्या आठ केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोमवारी सीबीआयने विशेष मोक्का न्यायालयाला दिली.
मुंबई: महाराष्ट्रात छोटा राजनवर नोंदवण्यात आलेल्या आठ केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोमवारी सीबीआयने विशेष मोक्का न्यायालयाला दिली.
गेल्या सुनावणीवेळी छोटा राजनच्या वकिलांनी सर्व केसेसमध्ये राजनला ताब्यात घेण्याचा आदेश सीबीआयला द्यावा, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. सीबीआयने या केसेसमध्ये पुन्हा एकदा एफआयआर नोंदवावा लागेल आणि ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे या अर्जावर नंतर उत्तर देऊ, असे न्यायालयाला सांगितले. सीबीआयच्या या भूमिकेवर राजनच्या वकिलांनी आक्षेप घेतला.
पुन्हा एकदा एफआयआर नोंदवणे, ही एक औपचारिकता आहे आणि छोटा राजनला ताब्यात घेण्याच्या निर्णयात ही औपचारिकता अडथळा असू शकत नाही, असे म्हणत न्या. आडकर यांनी छोटा राजनच्या वकिलांना संबंधित निकाल सादर करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, जेडे हत्याप्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच
पूर्ण होईल, अशी माहितीही सीबीआयने न्या. आडकर यांना दिली. त्यावर न्या. आडकर यांनी जेडे हत्येप्रकरणाची सुनावणी २८ मार्च रोजी ठेवली. ते राजनच्या अर्जावरील सुनावणी १७ मार्च रोजी ठेवली
आहे. (प्रतिनिधी)