खंबाटकी बोगद्याजवळ दोन अपघातांत दोघे ठार
By admin | Published: November 23, 2015 02:27 AM2015-11-23T02:27:18+5:302015-11-23T02:27:18+5:30
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, तर ५१ जण जखमी झाले आहेत.
खंडाळा/भुर्इंज : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, तर ५१ जण जखमी झाले आहेत. दोन खासगी प्रवासी बसची रविवारी पहाटे ‘एस’ वळणावर समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक ठार, तर ४५ जण जखमी झाले. तर दुसरा अपघात वेळे हद्दीत बोगद्याजवळ रविवारी सायंकाळी झाला. यातही एक जण ठार
झाला.
खंबाटकी बोगदा ओलांडून खासगी प्रवासी बस रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे निघाली होती. ‘एस’ वळणावर बस आली असता अचानक समोरून उलट्या दिशेने दुसरी खासगी प्रवासी बस भरधाव वेगाने आली. त्यामुळे दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक बसली.
ही धडक एवढी भीषण होती की, शिराळ्याकडे निघालेली बस पाचशे मीटर मागे ढकलली गेली आणि रस्त्याच्या बाजूला सुमारे वीस फूट खोल खड्ड्यात उलटली. दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.
अपघातानंतर बसचालकाने गाडीतून उडी मारून पोबारा केला.
या अपघातात ४५ जण जखमी
झाले, तर दीपक शिवाजी निकम
(४०, रा. इंदिरानगर, कळवा, मुंबई)
हे ठार झाले.
दुसरा अपघातही वाई तालुक्यातील वेळे येथे खंबाटकी घाटाच्या बोगद्याजवळच रविवारी सायंकाळी झाला. कार बाजूच्या कठड्यावर आदळल्यामुळे वाहनचालक सतीश बाळू वैराट (५०, रा. कॅन्टोमेंट बोर्ड, खडकी, पुणे) हे ठार झाले.
तर तानाजी सुखदेव ननवरे (४०, रा. खडकी पुणे) हे गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर असणारे इतर पाच जण किरकोळरीत्या जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)