पिंपरी-चिंचवडमधील वाकडमध्ये मुळा नदीत दोन मुलं बुडाली; शोधकार्य सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 07:12 PM2017-09-05T19:12:29+5:302017-09-05T20:18:40+5:30
शहरातील वाकड कस्पटे वस्ती येथील मुळा नदीत दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन मुलं बुडाल्याची माहिती मिळते आहे.
पिंपरी-चिंचवड, दि. 5- शहरातील वाकड कस्पटे वस्ती येथील मुळा नदीत दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन मुलं बुडाल्याची माहिती मिळते आहे. दुपारपासून पिंपरी चिंचवड फायर ब्रिगेडच्या जवानांकडून या दोन मुलांचा शोध सुरू आहे. तसंच वाकड सांगवी पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुळा नदीत बुडालेली ही मुलं गवत आणि गाळात रुतल्याची भीती व्यक्त होत आहे.
मुळा नदीत बुडालेल्या सोनाजी धनाजी शेळके (वय १६, जिनतुर, परभणी) आणि रखमाजी सुदामराव वारकड (१७ पाटोडा परभणी) अशी दोघांची नावे आहेत. हे दोघे सध्या बालेवाडी म्हातोजी नगर येथे राहत होते. ते बालेवाडी ठाण्याच्या हद्दित बुडाले होते पण नदीला पाणी असल्याने ते वाहत सांगवी पोलीस हद्दित आल्याची शंका असल्याने त्यानुसार शोध कार्य सुरु आहे.
स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने फायर ब्रिगेडची शोध मोहिम सुरु आहे वाकड आणि बालेवाडी गावाच्यामधून ही नदी गेली आहे. बालेवाडीत एका विट भट्टीवरील मजूरांची ही मुलं असल्याची प्राथमिक माहिती वाकड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिली आहे. बालेवाडी नदी किनाऱ्याजवळून ही मुलं पाण्यात उतरली असल्याचं समजतं आहे.