मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे केरळची दोन मुले परतली घरी
By admin | Published: March 19, 2017 01:09 AM2017-03-19T01:09:06+5:302017-03-19T01:09:06+5:30
केरळमधून गायब झालेल्या दोन मुलांचा महिन्याभरापासून सुरु असलेला शोध अखेर संपला. मुंबई रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून ताब्यात घेण्यात आले होते.
मुंबई : केरळमधून गायब झालेल्या दोन मुलांचा महिन्याभरापासून सुरु असलेला शोध अखेर संपला. मुंबई रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून ताब्यात घेण्यात आले होते.
रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिन्यापूर्वी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने कुर्ला टर्मिनसवर घाबरलेल्या अवस्थेतील ६ वर्षांचा आर्यन आणि ४ वर्षांची अमृताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुलांची चौकशी केली असता ती मुले दक्षिणात्य भाषेत बोलत असल्यामुळे त्यांना काही समजले नाही. या मुलांना बाल कल्याण विभागाच्या ’बालमंदिर’ या चेंबूर येथील बालगृहात ठेवण्यात आले. येथे आलेल्या एका व्यक्तीने ओळखले की ही मुले मल्याळम भाषेत बोलत आहेत. यावेळी केरळ पोलिसांशी संपर्क साधल्यावर ते याच दोन मुलांना शोधात आहेत असल्याचे समजले.
वर्षभरापूर्वी या मुलांच्या आई शोभा हिने प्रियकर मंजुनाथच्या मदतीने वडील राजू यांची हत्या केली होती. हत्येनंतर त्यांनी राजूचे शव जंगलात नेऊन जाळले. त्यानंतर शोभाने मंजुनाथला सोबत राहण्यासाठी आग्रह धरला. मात्र मंजुनाथने तिला नकार दिला. शोभापासून सुटण्यासाठी त्याने तिचाही काटा काढला. शोभाची महिन्याभरापूर्वी हत्या केली आणि तिचे शव एका विहिरीत टाकून दिले. केरळच्या इरिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे शव सापडल्यामुळे या हत्येची उकल करण्याची जबाबदारी सब इन्स्पेक्टर ए. अंशद यांच्याकडे सोपवण्यात आली. तपासादरम्यान त्यांना मंजुनाथचा सुगावा लागला आणि त्यांनी त्याला अटक केली. आपला गुन्हा कबूल केल्यानंतर मंजुनाथने सांगितले, शोभा आणि राजूच्या दोन मुलांना त्याने बेंगलोर येथून एका ट्रेनमध्ये बसवून दिले, त्या नंतर ती मुले कुठे गेली ते त्याला माहित नव्हते. सब इन्स्पेक्टर ए. अंशद आणि त्यांच्या सर्वत्र त्यांचे फोटो पाठवले होते. (प्रतिनिधी)
आत्याने स्वीकारली जबाबदारी
गुरुवारी ए. अंशद यांच्या नेतृत्वात केरळ पोलिसांची टीम, मुलांची आत्या काव्या आणि तिचे पती मुंबईत आले. शुक्रवारी चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या समोर मुलांची आत्या काव्या हिने मुलांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुलांना केरळ पोलिसांसोबत आपल्या घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. शनिवारी ही मुले आपल्या घरी परतली आहेत.