चकली चोरीच्या संशयातून दोन मुलांची नग्न धिंड
By Admin | Published: May 22, 2017 04:19 AM2017-05-22T04:19:38+5:302017-05-22T04:19:38+5:30
दुकानातील चकली चोरून खाल्ल्याच्या संशयातून दुकानदार व त्याच्या मुलांनी दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करून
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : दुकानातील चकली चोरून खाल्ल्याच्या संशयातून दुकानदार व त्याच्या मुलांनी दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांचे मुंडण करत गळ्यात चपलांचा हार टाकून नग्न धिंड काढली. इतकेच नव्हे तर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याने उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदार महमूद पठाण व त्याची दोन मुले इरफान व तौलिक यांना अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ प्रेमनगर टेकडीतील महात्मा फुलेनगर येथे दोन्ही पीडित मुले आपल्या कुटुंबासह राहतात. नऊ वर्षांचा रोहन व आठ वर्षांचा सुरेश (नाव बदलले आहे) मित्रांसोबत परिसरात खेळत होते. त्यावेळी दुकानदार महमूद पठाण व त्यांची दोन मुले इरफान व तौलिक यांनी त्यांना बोलावून घेतले. त्या दोघांवर आपल्या दुकानातून चकली चोरल्याचा आरोप करत तिघांनी त्यांना मारहाण केली. या मुलांचे अर्धवट मुंडण करून गळ्यात चपलांचा हार घालत त्यांची परिसरातून धिंड काढली.
या धिंडीचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला. पीडित मुलांचे वडील बेठबेगारी, तर आई धुणी-भांडी करीत असल्याने त्यांना हा प्रकार रात्री समजला.
पीडित मुलांच्या आई-वडिलांनी स्थानिक नागरिक व भारिप युवा आघाडीचे अॅड. जय गायकवाड यांच्या मदतीने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांनी महमूद पठाण यांच्यासह त्यांची मुले तौलिक व इरफानवर अॅट्रोसिटी अॅक्टसह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शिवसेना, रिपाइं, भारिप, पीआरपीसह भाजपाने या घटनेचा निषेध केला. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.
तिघा आरोपींना अटक व पोलीस कोठडी
पीडित मुलांच्या आई-वडिलांनी स्थानिक नागरिक व भारिप युवा आघाडीचे अॅड. जय गायकवाड यांच्या मदतीने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांनी महमूद पठाण यांच्यासह त्यांची मुले तौलिक व इरफानवर अॅट्रोसिटी अॅक्टसह पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.