रेवस-रेड्डी मार्गावरील चार पुलांच्या उभारणीसाठी दोन कंपन्या, लवकर निविदा अंतिम केल्या जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:01 AM2024-06-10T08:01:51+5:302024-06-10T08:02:16+5:30
Revas-Reddy road: कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर रेवस ते रेड्डी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी महामार्गावरील चार खाड्यांच्या कामासाठी दोन कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्यामध्ये अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्ट्रक्शन कंपनीचा समावेश असून, लवकर या निविदा अंतिम केल्या जाणार आहेत.
मुंबई - कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर रेवस ते रेड्डी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी महामार्गावरील चार खाड्यांच्या कामासाठी दोन कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्यामध्ये अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्ट्रक्शन कंपनीचा समावेश असून, लवकर या निविदा अंतिम केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कुंडलिका, काळबादेवी, जयगड आणि कुणकेश्वर येथे पुलांच्या उभारणीसाठी निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात निविदा मागविल्या होत्या. त्याच्या तांत्रिक निविदा मे महिन्यात खुल्या करण्यात आल्या होत्या. या निविदांना चार कंपन्यांनी प्रतिसाद देत नऊ निविदा भरल्या होत्या.
एमएसआरडीसीकडून नुकत्याच त्याच्या आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अशोक बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री या कंपन्यांना प्रत्येकी दोन खाड्यांच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. त्यामध्ये विजय एम मिस्त्री कंपनीने कुणकेश्वर आणि कळबादेवी खाडीवरील पुलाच्या कामासाठी लघुतम निविदा दाखल करून बाजी मारली आहे, तर अशोका बिल्डकॉन कंपनीने जयगड आणि कुंडलिका खाडीवरील पुलाच्या कामासाठी लघुतम निविदा दाखल केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आता या निविदा अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर पुलाच्या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. रेवस ते सिंदुधुर्गमधील रेड्डी दरम्यान ४४७ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग उभारला जात आहे. त्याचाच भाग म्हणून या मार्गावर खाडी भागात ८ ठिकाणी नवीन खाडी पुलांचे आणि २ उड्डाणपुलांचे काम प्रस्तावित आहेत.
या पुलांचे होणार काम
कुंडलिका खाडीवर रेवदांडा ते साळव खाडी पूल - ३.८ किमी (पोचमार्गासह)
जयगड खाडीवरील तवसळ ते जयगड खाडी पूल - ४.४ किमी (पोचमार्गासह)
काळबादेवी येथील पूल - १.८५ किमी (पोचमार्गासह)
कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम - १.५८ किमी (पोचमार्गासह)