अडीच कोटींच्या जुन्या नोटा जप्त
By admin | Published: March 2, 2017 05:23 AM2017-03-02T05:23:48+5:302017-03-02T05:23:48+5:30
ठाण्याच्या टेंभीनाका परिसरातून मंगळवारी १ कोटी २९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
ठाणे/ पुणे : ठाण्याच्या टेंभीनाका परिसरातून मंगळवारी १ कोटी २९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तर, पुण्यातील पिंपरीतही चलनातून बाद झालेल्या नोटांची १ कोटी ३६ लाख २६ हजारांची रोकड घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही प्रकरणांची माहिती प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
ठाण्याच्या टेंभीनाका येथे काही जण चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजारांच्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती, ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून त्यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक हजारांच्या ९ हजार ९००, तर पाचशेच्या ६ हजार नोटा अशा एकूण १ कोटी २९ लाखांची रक्कम जप्त केली.
तर, पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना दिघी येथील मॅगझिन चौकात एक मोटार संशयास्पद फिरत होती. पोलिसांनी मोटारीची तपासणी केल्यावर चलनातून बाद झालेल्या नोटांची १ कोटी ३६ लाख २६ हजारांची रोकड मिळाली. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ते जात होते. याच मार्गावर त्यांना आणखी एकजण भेटणार होता. परंतु नेमकी ती व्यक्ती कोण, याचा उलगडा अजून झालेला नाही.
कबुली २५ दिवसांनी
जुन्या नोटांची २० लाख रुपयांची रक्कम जप्त केल्याचे बुधवारी कोथरुड पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले. नोटा जप्त करुनही तब्बल २५ दिवस या प्रकरणाची माहिती पुढे न आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. (प्रतिनिधी)
>अंबरनाथमध्ये बनावट नोटा
शंभर रुपयांच्या बनावट नोटा तयार करून, त्या खपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी कारवाई केली आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील कोहजगाव परिसरात एका युवकाने अॅम्बी फ्र्रेश मार्ट या दुकानातून सामान खरेदी करण्यासाठी १०० रुपयांची नोट दिली. मात्र, या दुकानाच्या मालक कविता रॉय यांना शंका आल्याने, त्यांनी त्याला परत पाठवले.
या युवकाने त्याच परिसरातील दुसऱ्या एका दुकानात तीच नोट खपवण्याचा प्रयत्न केला. या वेळी मात्र, या युवकाला त्या दुकानदाराने इतर नागरिकांच्या मदतीने पकडून ठेवले आणि पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले, तेव्हा त्याचे नाव आनंद पुजारी (१९) असल्याचे समजले. पोलिसांना त्याच्याकडून शंभरच्या चार बनावट नोटाही मिळाल्या. ही नोट हुबेहूब खऱ्या नोटेसारखी दिसत होती. मात्र, त्यावर वॉटर मार्क नसल्याने ही बनावट नोट उघडकीस आली.
आनंदला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने आपल्या साथीदाराचे नाव सांगितले. व्यंकट मोकल आणि हणमंता मेहेत्रे यांना न्यू बालाजीनगर येथून अटक केली. त्यातील हणमंता याच्या घरातून पोलिसांनी उच्च प्रतीचा प्रिंटर, उच्च दर्जाचा पेपर, कटर व शंभर रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजू तेवर असल्याचे पोलिसांनी सांगितले.