कोल्हापुरात दोन कोटींचा दरोडा
By admin | Published: June 19, 2016 12:35 AM2016-06-19T00:35:11+5:302016-06-19T00:35:11+5:30
‘तुमच्या व्हॅनमध्ये ड्रग्ज आहेत, आम्ही पोलिस आहोत’ अशी बतावणी करून एका व्हॅनसह ६१५ किलो चांदी, दीड तोळ्याचे सोन्याचे नवीन दागिने, २८ किलो तांब्याच्या धातूचे मणी असा
कोल्हापूर : ‘तुमच्या व्हॅनमध्ये ड्रग्ज आहेत, आम्ही पोलिस आहोत’ अशी बतावणी करून एका व्हॅनसह ६१५ किलो चांदी, दीड तोळ्याचे सोन्याचे नवीन दागिने, २८ किलो तांब्याच्या धातूचे मणी असा सुमारे दोन कोटी २१ लाख ५९ हजार २२० रुपयांचा दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे घडली. पोलिसांच्या चपळाईमुळे अवघ्या चार तासांत दरोड्यातील माल हस्तगत करण्यात यश आले.
शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘कोल्हापुरातील महाद्वार रोड लागून असलेल्या भेंडे गल्लीत साईनाथ एक्सप्रेस सर्व्हिस या कुरिअर सर्व्हिस कंपनीत व्यवस्थापक म्हणून राजकिशोर मास्टर परमार (वय ३०, सध्या राहणार शिवाजी चौक, कोल्हापूर) हे काम पाहतात. याठिकाणी योगेश शर्मा, सुनील परमार, संदीप तोमर, भोले राजाबथ , अंकित परमार हे कामगार आहेत. या कंपनीच्या कोल्हापूर, मुंबई, मालाड, भोलेश्वर, बडोदा, सुरत, अहमदाबाद, राजकोट, दिल्ली, उदयपूर या शहरांमध्ये शाखा आहेत. कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेमधून आॅर्डरप्रमाणे माल घेऊन त्याच्या पार्सलचे काम या कंपनीकडून केले जाते. त्यामध्ये चांदी, सोन्याचे ऐवज असा माल असतो. यासाठी कंपनीची व्हॅन (एमएच ०९ -एयू-४८९१) वापरली जाते.
शुक्रवारी रात्री कोल्हापुरातील ५९ सराफ व्यावसायिकांचे सोन्या-चांदीचे दागिने, ऐवज आणि कामगार योगेश शर्मा व सुनील परमार अशा दोघांना घेऊन चालक तुषार नाईक भेंडे गल्लीतून व्हॅनमधून निघाले. त्यांच्या व्हॅनपाठोपाठ दुचाकीवरून संदीप तोमर, भोले राजाबथ हे दोघे कामगार येत होते. त्यांची व्हॅन शासकीय विश्रामगृहाजवळ आल्यावर चौघेजण एका कारमधून (एमएच ९१९५) व्हॅनजवळ आले. त्यांनी चालक नाईक, योगेश शर्मा व सुनील परमार यांना खाली उतरवले. ‘आम्ही पोलिस आहोत, तुमच्या व्हॅनमध्ये ड्रग्ज आहेत’ असे सांगून या तिघांना त्या अज्ञातांनी आपल्या कारमध्ये बसविले. याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून येणारे कामगार संदीप तोमर व भोले राजाबथ यांना हा प्रकार दिसला. त्यांनी व्यवस्थापक राजकिशोर परमार यांना हा प्रकार सांगितला. राजकिशोर यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला. (प्रतिनिधी)