विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दोन कोटींची मदत
By Admin | Published: May 8, 2017 04:41 AM2017-05-08T04:41:03+5:302017-05-08T04:41:03+5:30
खासदार संजय काकडे आणि उषा काकडे यांच्या कन्या कोमल हिचा विवाह, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खासदार संजय काकडे आणि उषा काकडे यांच्या कन्या कोमल हिचा विवाह, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन यांच्याशी रविवारी पुण्यात थाटात झाला़ या लग्नासाठी झालेल्या खर्चाइतका २ कोटी रुपयांचा निधी संजय काकडे आणि सुभाष देशमुख यांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिला आहे.
उभय कुटुंबीयांनी ‘रोहन-कोमल शिक्षण योजना’ हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून, २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला़ या प्रसंगी ‘लोकमत’ मीडिया प्ऱा़ लि़चे चेअरमन विजय दर्डा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उद्योजक सूर्यकांत काकडे आदी उपस्थित होते़ या विवाह सोहळ्याला राजकीय, सामाजिक, उद्योग, व्यापार क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते़
याबाबत संजय काकडे यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असूनदेखील, केवळ आर्थिक अडचणीमुळे ते पुढील शिक्षण घेऊ शकत नाही़त.ज्या दिवशी आमची सोयरीक जुळली़ त्याच दिवशी मुला-मुलींसाठी एक अनोखी भेट द्यावी, असे ठरवले़ लग्नासाठी जो खर्च येईल, तेवढाच निधी देऊन, आम्ही आमची सामाजिक बांधिलकी म्हणून ‘रोहन-कोमल शिक्षण योजना’ राबवित आहोत़ या योजनेसाठी २ कोटी रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्र्द करीत आहोत़ याच्या व्याजातून किमान १०० विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे़
या गरजू विद्यार्थ्यांची निवड ७ मे ते ७ जून या दरम्यान आमच्याकडे येणाऱ्या अर्जांतून केली जाणार आहे. किमान १०० विद्यार्थी निवडले जातील़ निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत मदत करण्यात येईल़ चालू वर्षासाठी आणखी २५ लाख रुपये वेगळे दिले जातील़ इतरांनाही मदत करायची असल्यास, या २ कोटी रुपयांमध्ये पैसे जमा करावेत, म्हणजे आणखी जास्त विद्यार्थ्यांना मदत मिळू शकेल, असे आवाहन संजय काकडे यांनी केले आहे़